आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा: नाशकात छापा ‘ई-पासपोर्ट’; मजदूर संघाचे संसदीय स्थायी समितीला साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई-पासपोर्ट छपाईचा प्रस्ताव सुरक्षेच्या कारणास्तव लालफितीत अडकून पडला आहे. सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना करुन या प्रस्तावाला हिरवा कंदील देण्याची आग्रही मागणी आयएसपी मजदूर संघाने सोमवारी संसदीय स्थायी समितीकडे केली.

जेलरोड येथील प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीप्रसंगी समितीचे चेअरमन माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, खासदार चंद्रकांत खैरे, हरिश्चंद्र चव्हाण, तर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे, उपाध्यक्ष माधवराव लहांगे, इपीएफ ट्रस्ट्री ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनिल अहिरे, राजेश टाकेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. बाजारातील स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी इंडिया सिक्युरिटी, करन्सी नोट प्रेसच्या क्षमतेनुसार आधुनिकीकरणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन द्यावा, कामगारांनी महामंडळाचा स्विकार केल्यानंतर कामगारांच्या शिल्लक रजांची 121 कोटी रुपयांची रक्कम महामंडळाकडे वर्ग करावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या. महामंडळाच्या करारानुसार समान काम, समान वेतन स्विकारलेले असताना त्यात अनेक त्रूटी होत्या. त्यातील दुरुस्तीनंतरच कराराची अंमलबजावणी व्हावी, अनुकंपा तत्वावर मृत कामगारांच्या वारसांना सेवेत सामावून घ्यावे, वारसांना प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेऊन शैक्षणिक अट पुर्ण केल्यावर कायम करावे, महामंडळाच्या प्रगतीसाठी आयएसपीने पुरवठा केलेल्या पोस्टल डिपार्टमेंटच्या मालाची रक्कम 160 कोटी सरकारच्या पोस्टल डिपार्टमेन्टलकडे वर्ग करण्यात यावी, अशी गळही समितीला घालण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी संघाच्या मागण्या रास्त असल्याचे सांगितले. चेअरमन सिन्हा यांनी मागण्यांचा गांभिर्याने विचार करुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

पोलिस गाडीला रोखले
राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या ताफ्याप्रमाणे संसदीय समिती सदस्य, महामंडळाचे अधिकारी यांचे स्वतंत्र वाहनाने जेलरोड मार्गे आगमन झाले. प्रत्येक वाहनाने वेगानेच करन्सी नोट प्रेसच्या प्रवेशव्दारातुन आत प्रवेश केला. सर्वात शेवटी असलेली शहर पोलिसांची गाडी मात्र सुरक्षा दलाच्या जवानांनी रोखली. त्यामुळे पोलिसांना बाहेरच थांबावे लागले.

कामगारांचे थेट कामकाज
संसदीय समिती प्रेसच्या पाहाणीसाठी येणार असल्याने कामगारांना अगोदरच सूचना देऊन सोमवारी कामाला येताना जेवणाचे डबे सोबत आणण्याची सूचना देण्यात आली होती. या पाहणी दौर्‍यामुळे सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत कामगारांना जेवणाची सुट्टी न घेता काम करावे लागले. समितीविषयी कामगारांत उत्सुकता आणि गांभिर्य दिसून येत होते.

गोपनीय अहवाल संसदेकडे जाणार
भारत सरकारच्या महत्त्वपूर्ण संसदीय स्थायी समितीने इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेसच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रत्यक्ष प्रेसला भेट देत कामकाजाची पाहणी केली. यासंदर्भातील गोपनीय अहवाल तयार करण्यात आला असून, तो संसदेला सादर करणार असल्याची माहिती संसदीय स्थायी समितीचे चेअरमन तथा माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

समितीत सिन्हा यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, निशिकांत दुबे, भ्रुतहरी महाताब, ए. संपत, डॉ.तंबु दुरई, शिवकुमार उदासी हे सहभागी होते. त्यांनी विविध विभागांची पहाणी केली. त्यानंतर समितीची प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत महामंडळाचे सीएमडी एम. एस. राणा यांनी दोन्ही प्रेससह देशातील नऊ प्रेसच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा अहवाल सादर केला. प्रेसचे महामंडळातील रुपांतरानंतर प्रथमच आलेल्या समितीच्या दौर्‍याकडे प्रेस कामगारांचे लक्ष लागले होते.