आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • E Sahitya Sammelan News In Marathi, Unique Features, Anubhav Magazine

ई-साहित्य संमेलन: लोकगीतांतून अंकुरले कवितेचं बीज, महानोर यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जात्यावरच्या ओव्या, तमाशा, नृत्य, शाहिरी परंपरा, भारूड, कीर्तन या लोकगीतांच्या लयीने कवितेच्या अंकुराचे बीज रुजविले अन् रानातल्या कविता उभ्या डौलदार पिकांप्रमाणे बहरत गेल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी येथे केले.


कुसुमाग्रज स्मारकात युनिक फीचर्स आणि अनुभव मासिक यांच्या वतीने आयोजित चौथ्या मराठी ई-साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून सोमवारी ते बोलत होते. कवी प्रकाश होळकर यांनी महानोर यांची मुलाखत घेतली. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते संगणकावर कळ दाबून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी युनिक फीचर्सचे संचालक-संपादक सुहास कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी, कवी प्रकाश होळकर, गौरी कानेटकर, मुक्ता चैतन्य आदी उपस्थित होते.


महानोर पुढे म्हणाले की, स्वत:च्या साहित्यावर प्रेम करण्याऐवजी ‘इतरांच्या साहित्यावर प्रेम केलं पाहिजे’, असा अनुभव कथन करीत महाराष्ट्राच्या मातीत कोणी चांगलं लिहीत गेलं तर त्याच्यावर साहित्यरसिक प्रेम करतात. साहित्यप्रेमींचा हा परिसस्पर्शच मराठी साहित्याला समृद्ध करू शकतो, शेतीवाडी, शेतीनिष्ठा आणि रानातील झाडं हे माझे गणगोत आहे. त्यांच्यावर प्रेम केलं म्हणून कविता ओठांवर आली. ‘या शेतानं लळा लाविला’ या रानातल्या कवितेत शब्दलय, देशीपण व रानातलं रानपण आहे. त्या आठ कवितांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. लोकगीतांतून कविता फुलत गेल्याचं त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, रसिक भरभरून प्रेम करतात, हे आलेल्या पत्रांच्या अनुभवांतून त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी पत्राद्वारे व्यक्त केलेला ‘ओंजळीतून वाहणारा स्नेह’ हा सर्वांत आनंददायी क्षण असल्याचेही ते म्हणाले. या वेळी ‘मराठी वर्ल्ड’ संकेतस्थळाच्या भाग्यश्री व अनुराग केंगे तर ‘मराठी माती’च्या हर्षद खंदारे, स्वाती खंदारे व सुनील खांडबहाले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


संमेलनाचे थेट प्रक्षेपण..
एकाच वेळी अनेकांपर्यंत, संवाद माध्यम, जात, धर्म अन् प्रांतिक वादांना फाटा हे या मराठी ई-संमेलनाचे वेगळेपण असल्याचे युनिक फीचर्सच्या गौरी कानेटकर यांनी सांगितले. संकेतस्थळावर मुक्त कट्टा, चर्चा, साहित्यिकांची माहिती, संमेलनाध्यक्षांची माहिती, ग्रामीण तरुणांचं कविसंमेलन, ब्लॉग, साहित्य व्यवहारांचं बॅक स्टेज, पासवर्ड दिवाळी अंक असे विविधांगी वेगळेपण असलेल्या या संमेलनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत असल्याने जगभरातील वाचकांना त्यात सहभागी होता येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

साहित्य संक्रमणाचा काळ
अज्ञानात आनंद असतो व तो मी उपभोगतो, असे संमेलनाचे उद्घाटक विनायकदादा पाटील यांनी सांगितले. साहित्य संमेलने ही अभिजनांकडून बहुजनांकडे जात आहेत. तर, ग्रंथातून ई-बुककडे आपण जात आहोत. संमेलनाच्या माध्यमातून साहित्याचा संसार व्यापक होत असल्याने हा त्याचा संक्रमणाचा काळ असल्याचे ते म्हणाले. मराठी ई-साहित्य संमेलन हे इतर साहित्य संमेलनातील उणिवांवर मात करणारे आहे, असेही ते म्हणाले. जुन्या परंपरांना फाटा देत नवीन कल्पनांना स्वीकारणारं हे संमेलन एकाच ठिकाणी व्हावं, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.