आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळ ऑपरेशन्सची लवकरच इ-निविदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकविमानतळाच्या हस्तांतरणाचा तिढा अद्याप सुटला नसला तरीही, फेब्रुवारीअखेर हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता पाहता हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडकडून (एचएएल) विमानतळ ऑपरेशन्ससाठीच्या इ-निविदा लवकरच बोलाविल्या जाणार आहेत. खुल्या प्रकारातील या निविदा ऑनलाइन प्रक्रियेतून भरता येणार असून, निविदा प्रसिद्ध करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वीच नाशिककरांना नियमित (शेड्युल्ड) विमानसेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
राज्य शासनाने कागदाेपत्री नाशिक विमानतळ अद्यापही एचएएलकडे हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे विमानतळ ऑपरेशन्ससाठीच्या निविदांना आधीच विलंब झाला असून, त्याचा फटका मात्र विमानसेवेची मागणी करणा-या नाशिककरांना बसतो आहे. दुसरीकडे एचएएलकडून ‘डीजीसीए’कडे विमानतळ परिसराचे नकाशे मागील महिन्यात अपलाेड करण्यात अाल्याने हे विमानतळ जागतिक नकाशावर पुढील तिमाहीत झळकणार असल्याने ही विमानसेवा आणखी तीन महिने पुढे ढकलली गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या तीन महिन्यांच्या कालावधीनंतर विमानतळ ऑपरेशन्ससाठीच्या निविदा अामंत्रित करून अधिक वेळ वाया जाऊ नये, विमानसेवेस विलंब टळावा, या उद्देशाने फेब्रुवारीतच इ-निविदा काढण्यास प्राधान्य दिले जात आहे.

निविदा आमंत्रित करण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, फेब्रुवारी महिन्यातच त्या संकेस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याचे समजते. या निविदा खुल्या स्वरूपाच्या असतील त्यामुळे विमानतळ ऑपरेशन्सबाबत अनुभव निकष पूर्ण करणा-या संस्थांना ही संधी मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांपुढेही मांडला जाणार हस्तांतरणाचा मुद्दा
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी हस्तांतरणाचा तिढा सुटावा, यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना विनंती केली होती. त्यानंतर "एचएएल'च्या दौ-यावर असताना पर्रीकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून संवाद साधत हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी हस्तांतरण करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अद्याप मूर्त स्वरूप आलेले नाही. दरम्यान, २१ फेब्रुवारीला मुख्यमंत्री नाशिक दौ-यावर येणार असून, त्यात शहरातील विविध संघटना हस्तांतरणाच्या मुद्द्यासह विमानसेवेबाबत मागणी करण्याचे संकेत आहेत.

प्रशासनाला रस केवळ ओल्या पार्ट्यांमध्ये
मुख्यमंत्री,संरक्षणमंत्र्यांनी आदेश देऊनही विमानतळाचे हस्तांतरण "एचएएल'ला केले जात नाही. प्रशासन या आदेशालाही जुमानताना दिसत नसले, तरी विमानतळाचा वापर ओल्या पार्ट्यांसाठी करण्यात चांगलाच रस दाखवित असल्याचे समोर आले असून, त्या प्रकारावर शहरासह राज्यभरात टीका सुरू आहे.