आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदगावात दर सोमवारी खासगी वाहने राहतात बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वेगाने घसरल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे सोने खरेदी आणि इंधन बचतीचा सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला आहे. यात खारीचा वाटा उचलत इंधनात बचत करण्याच्या हेतूने नांदगावमधील (जि. नाशिक) नागरिकांनी दर सोमवारी खासगी वाहने न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तहसील कार्यालयात झालेल्या अनौपचारिक चर्चेत हा निर्णय घेण्यात आला. या चर्चासत्रात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक, पत्रकार सहभागी झाले होते. या उपक्रमात लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जावेत, असेही या वेळी ठरवण्यात आले. त्यासाठी कृतिशील कार्यक्रमाची आखणीही करण्यात आली.


राजकीय पक्ष लावणार फलक : भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीतर्फे रस्त्यांवर फलक लावून आणि चौकांमध्ये बॅनर लावून इंधनबचतीसाठी खासगी वाहने न वापरण्याचे आवाहन केले जाणार आहे.


माजी सैनिकांकडून प्रेरणा
देशाच्या रक्षणासाठी तैनात राहिलेल्या नांदगाव तालुक्यातील माजी सैनिकांनी या वेळी सामान्य नागरिकांत इंधन बचतीसाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. देशात तयार होणारे इंधन प्रथम संरक्षण विभागासाठी वापरले जाते. उर्वरित खुल्या बाजारात सामान्यांसाठी विक्रीला पाठवले जाते. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील गरज पूर्ण होत नसल्यामुळे अरब देशांमधून इंधनाची आयात करावी लागते. त्यासाठी जादा डॉलर खर्च होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येतो, हे सामान्यांना पटवून देण्यात येणार आहे, असे अ‍ॅड. गुलाबराव पालवे यांनी सांगितले.


वाचणार 11 हजार लिटर इंधन
नांदगाव येथे दर सोमवारी सरासरी अकरा हजार लीटर इंधनाची विक्री होते. नागरिकांनी खासगी वाहने बंद ठेवल्यास त्याची बचत होईल. या उपक्रमाची व्याप्ती वाढल्यास लाखो लीटर इंधन वाचवता येईल. आयातीचे प्रमाण त्यातून कमी झाल्यास ती बचत अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकेल, असा सूर या वेळी निघाला.


दुस-या महायुद्धकाळातील जपानचा आदर्श
दुस-या जागतिक महायुद्धाच्या वेळी जपानला रणगाड्यांची कमतरता जाणवू लागली. युद्धासाठी आवश्यक रणगाड्यांच्या निर्मितीसाठी पुरेसे लोखंड नसल्याने लहान मुलांना भंगार गोळा करण्यास सांगण्यात आले. त्यातून जमलेल्या लोखंडातून तीन रणगाडे तयार करण्यात आले. त्यापैकी दोन युद्धात नष्ट झाले. एक संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. त्यापासून नागरिकांना देशप्रेमाची प्रेरणा मिळते. हा आदर्श नजरेसमोर ठेवून इंधन बचतीत खारीचा वाटा उचलावा.’’ - सुदाम महाजन, तहसीलदार