आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक मूर्तींना ‘अंकुर’; ‘सृष्टी गणेश’ची अनोखी संकल्पना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या चळवळीने जोर धरला असला तरीही, शाडूच्या गणेशमूर्ती या खरोखरच संपूर्ण पर्यावरणपूरक आहेत का, असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी ‘सृष्टी गणेश’च्या माध्यमातून शहरातील तिघा पर्यावरणप्रेमींनी अंकुर गणेशाची अनोखी संकल्पना हाती घेतली आहे. या माध्यमातून गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर त्यातून परसबागेसाठीची फुलझाडे अंकुरणार आहेत. 
 
गणेशोत्सवादरम्यान शाडूमातीच्या गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध होत असल्या तरीही, अनेकदा त्यावरील रंग मात्र जलप्रदूषणाला कारणीभूत असे रासायनिक दिसून येतात. अशा मूर्तींना ‘अंकुर गणेश’ पर्याय ठरणार आहेत. त्यासाठी शहरातील अमोल कुलकर्णी, प्रशांत बेलगावकर, वृषाली कुलकर्णी या तिघांनी ‘सृष्टी गणेश’या नावाच्या माध्यमातून ही संकल्पना पुढे आणली आहे. अंकुर गणपती ही संकल्पना म्हणजे, काळ्या किंवा लाल अशा कोणत्याही सुपिक मातीचा वापर करत हे गणपती तयार करुन त्यात फळ फुलझाडांची बियाणे टाकली जातात. या गणपतींच्या विसर्जनासाठी घरच्याघरी कुंडीत ही मूर्ती ठेवावी. त्यावर पाणी टाकल्यास अवघ्या तीन ते पाच दिवसांमध्ये या मातीतून अंकुर बाहेर पडतात. विसर्जनाची ही पद्धत पर्यावरणालादेखील हानिकारक नाही. 
 
गेल्या वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सृष्टी गणेशच्या माध्यमातून केले जात आहे. तर, १६ वर्षांपासून शाळा-महाविद्यालयांमध्ये हे तिघे विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करत आहेत. मात्र, ज्या प्रमाणात नागरिक पर्यावरणपूरक मूर्ती वापरण्यासाठी पुढाकार घेत आहेत, त्या प्रमाणात त्यांना तसे पर्यायदेखील उपलब्ध हवे, या उद्देशाने ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. 
 
कधी अंकुर गणेशाची रंगवण्याची वेगळी तऱ्हा पहायला पेण येथून लोक इथे येतात तर कधी साच्यांची पद्धत शिकण्यासाठी मूर्तीकार भेट देतात. कोणत्याही प्रकारचे कलाप्रशिक्षण नसणारी ही मंडळी प्रबोधनासाठी कार्यरत आहे. या चळवळीला विचार म्हणून पुढे नेण्यासाठी मूर्तींच्या किमती कमी करत आता ‘ना नफा ना तोटा’ या सूत्राकडे ते वळले आहेत. त्यामुळे यंदा ‘अंकुर गणेश’ घरोघरी पोहोचवण्याचा ध्यास अमोल कुलकर्णी यांच्यासह सुनीता जानोरकर, दीपक दिघे, प्रसन्ना नाटकर, संदीप गांगुर्डे यांनी घेतला आहे. 
 
पर्यावरणपूरक ‘हल्दी गणेश’ 
हळद,आंबे हळद, कुंकू, चंदन, मुलतानी माती आणि गेरू यांसारख्या नैसर्गिक रंगांपासून अंकुर गणेशाची रंगरंगोटी केली जाते. शाडू मातीचा हा गणपती पर्यावरणासाठी हानिकारक नाही. त्याचे अंकुरताना पाहणे आगळा अनुभव ठरतो. 
 
दरवर्षी नवीन गोष्ट विचारात येते.. 
>पर्यावरणासाठीचा हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींबाबतचा गैरसमज दूर करावा लागला. "अंकुर गणेश'निर्मितीचा प्रयोग केला. यंदा त्यालाही प्रतिसाद मिळत आहे. "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर आम्ही काम करत आहोत.
-अमोल कुलकर्णी 
बातम्या आणखी आहेत...