आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुबक-देखणी शाडूची मूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीची मूर्ती आकर्षक नसते, असा सर्वसामान्य गैरसमज असतो. परंतु, शहरातील शाडू मातीच्या गणपती मूर्ती विक्रेत्यांकडे गेल्यास हा गैरसमज क्षणार्धात दूर हाेताे. कारण, येथील मूर्ती पाहिल्यानंतर त्या खरोखर शाडूच्या आहेत का, याचा विचार करावा लागेल एवढ्या त्या आकर्षक आहेत. अतिशय सुबक कलाकृती, चमकदार रंग अन् बारीक नक्षीकाम अशा स्वरूपातील शाडू मातीच्या मूर्ती आता बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत.

विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन आठवड्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे सगळीकडेच मूर्तिकामाने गती घेतली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणासाठी अतिशय घातक ठरत असल्याने अलीकडे पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती खरेदीकडे भाविकांचा कल वाढत आहे. परिणामी शाडू मातीच्या मूर्तींना मागणी वाढत आहे. अर्थात, शाडू मातीच्या मूर्तींविषयी अनेक गैरसमज आहेत. परंतु, मूर्तिकारांकडे गेल्यास ते दूरही हाेतात.

शाडू मातीच्या मूर्तीचे फायदे : शाडू माती पर्यावरणपूरक आहे, तसेच कोणत्याही घातक रसायानाचा अंश या मातीत नाही. त्यामुळे या मूर्तीचे विघटन अतिशय सोप्या पध्दतीने होते. मूर्ती विसर्जनानंतर ती पूर्णपणे विरघळते व कोणताही रासायनिक वा जैविक प्रभाव जलस्त्रोतावर होत नाही.
शाडू मातीच्या मूर्तीतील रुपे
सध्या शाडू मातीच्या मूर्तींची विविध रुपे बघायला मिळत आहेत. त्यात लालबागचा राजा, बालगणेश, राजसिंहासन, पेशवाई, नवश्या गणपती, अष्टवनिायकातील सर्वच रुपे, जास्वंद गणेश, मल्हार गणेश आदींचा समावेश आहे.
असे करा मूर्तीचे विसर्जन
मूर्ती बुडू शकेल एवढे पाणी अगदी बादलीत घेतले, तरीही ही मूर्ती काही वेळात विरघळते अथवा कोणत्याही जलस्त्रोतात मूर्ती विसर्जित केल्यास ती विरघळते. मूर्तीसोबत कोणतेही निर्माल्य अथवा अविघटनशील घटक टाकू नयेत.
पर्यावरणपूरक मूर्ती
शाडूच्या गणपतीत वैविध्य आणतानाच कलाकुसर करण्यास अधिक वाव असतो. या मूर्तीमुळे जलप्रदूषण होत नाही. ही मूर्ती घरच्या घरी बादलीभर पाण्यातही विसर्जित करता येते. पर्यावरण संवर्धनासोबतच शास्त्रानुसारही शाडूच्या मातीचे गणपती बनविणे योग्य आहे. गणपतीची मूर्ती ही पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभुतांमध्ये विलीन झाली पाहिजे, असे शास्त्र सांगते. यासाठी शाडू मातीची मूर्ती बनविली गेली पाहिजे. -शांताराम माेरे, गणपती मूर्तिकार