आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलवार हातांतून साकारले गणराय; शाडू मातीपासून गणेशमूर्ती कार्यशाळेला मोठा प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मांगल्याचे प्रतीक आणि आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सवदेखील पर्यावरणपूरक होऊन जलप्रदूषण रोखले जावे, या हेतूने ‘दिव्य मराठी’ व श्री यशश्री कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने आयोजित शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या दोनदिवसीय कार्यशाळेला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेत भाग्यश्री कुलकर्णी यांनी शाडू मातीच्या मूर्तीचे महत्त्व सांगून मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. तसेच, त्यावरील रासायनिक रंगांमधील विषारी घटक थेट पाण्यास मिसळतात. त्यातून जलप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर होते. गेल्या काही वर्षांपासून जलप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण जनजागृती करतानाच शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण मिळावे, हादेखील कार्यशाळेमागील हेतू होता. उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी उपमहापौर मनीष बस्ते, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी अनिल महाजन, श्री यशश्री कन्स्ट्रक्शनचे संचालक विराज लोमटे आदी उपस्थित होते.

या उपक्रमाला नगरसेवक सतीश सोनवणे, संभाजी मोरुस्कर, पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनीही भेट दिली. शनिवार व रविवारी गंगापूररोडवरील अण्णासाहेब मुरकुटे हॉल, कामटवाडे येथील सुवास्तू सोसायटी, रविवारी राजीवनगर येथील राजीव टाऊनशिप हॉल व नाशिकरोड येथील आशानगर सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी आयोजित या कार्यशाळेत लहानग्यांसह त्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
जनजागृतीही झाली
विविध सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून परंपरा लोप पावून विद्रूपीकरण वाढत चालले आहे. गणेशोत्सवात प्रदूषण वाढत असल्याने शाडू मातीचे महत्त्व या उपक्रमाच्या माध्यमातून सांगता आले. जागरूकता वाढल्याने पर्यावरणपूरक उत्सवाच्या दिशेने आपण पाऊल टाकले आहे.
विराज लोमटे, यशश्री कन्स्ट्रक्शन

संस्कृतीचे होईल रक्षण

प्लास्टिकचे साहित्य वरवर आकर्षक आणि तुलनेने स्वस्त वाटत असले तरी त्याचे दुष्परिणाम गंभीर असतात. त्यामुळे यंदा शाडू मातीची मूर्ती स्थापना करणार आहोत. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाच्या पुढाकाराची गरज आहे. या कार्यशाळेतून मूर्ती तयार करण्याची कला अवगत होण्यास मदत झाली.
सौ. नूपुरा व कु. तन्वी प्रभू, आई व मुलगी