आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Loan Issue, 18 Student Admission Cancel

नाशिकमध्ये शैक्षणिक कर्जाअभावी 18 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे दिल्या जाणार्‍या शैक्षणिक कर्जासाठी दोन वर्षांपासून शासनाकडून निधीच मिळाला नसल्याने या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
मातंग समाज व त्यातील पोटजातींचा शैक्षणिक विकास होण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येण्याच्या हेतूने योजना शासनाने सुरू केली. मात्र, महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून योजनेसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक अधिकार्‍यांनीही शासन दरबारीच हा विषय प्रलंबित असल्याचा ठेका धरला आहे. वारंवार खेटा मारूनही प्रस्ताव मंजूर होत नसल्याचे अर्जदार विद्यार्थ्यानी शासनाच्या या लाल फितीच्या कारभाराबाबत खंत व्यक्त केली.
18 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द
या योजनेस 2011 पासूनच निधी मिळालेला नाही. मात्र, 2011-12 प्रस्तावच आले नसल्याने ती बाब उघड झाली नाही. 2012-13 आणि 2013-14 या शैक्षणिक वर्षांमध्ये अनुक्रमे 12 आणि 6 असे एकूण 18 प्रस्ताव अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले. त्यांची तपासणी करून जिल्हा समितीकडून मंजुरी घेत ते मुंबईतील महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयास त्याच वेळी पाठवण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश निश्चितीनंतर प्रकरण महामंडळाकडे सादर केले जाते. त्यानुसार प्रवेश निश्चित होताच त्याचा प्रस्ताव महामंडळाकडे सादर झाला आहे. मात्र, ते धूळ खात पडल्यानेच या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतलेल्या संस्थेतून तो आर्थिक अडचणीअभावी रद्द करावा लागला आहे.
प्रस्ताव सादर केले
आलेले प्रस्ताव शासनाकडे योग्य कागदपत्रांसह सादर केले आहेत. परंतु, अद्याप त्यांना मंजुरीच मिळालेली नाही. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये त्यासंदर्भात मी चर्चाही केली आहे. मात्र, त्यातही निधीच नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता निधी मिळाल्यावरच प्रस्ताव मंजूर केले जातील.
-एस. एन. आरणे, जिल्हा व्यवस्थापक, अण्णा भाऊ साठे महामंडळ