आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Educational News In Marathi, Virtual Class Started In Pune University, Divya Marathi

पुणे विद्यापीठाचे आभासी वर्ग, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विद्यार्थ्यांसाठी ई-ग्रंथालय व विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू केले खरे; मात्र ते पुढेही कार्यरत राहिले तरच त्याचा फायदा घेता येईल. म्हणून विद्यापीठाच्या सुविधा केंद्र विभागासह नाशिकमधील विभागीय केंद्रानेही कायम तत्पर राहत ई-ग्रंथालय आणि केंद्र पुढेही कार्यरत ठेवावे, असा सल्ला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनीच जबाबदार अधिकारी-कर्मचार्‍यांना दिला आहे. विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात ई-ग्रंथालय आणि विद्यार्थी सुविधा केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
विद्यार्थी तसेच संशोधन करू इच्छिणार्‍यांना या सुविधांचा फायदा होईल, तर विविध कामांसाठी विद्यापीठात जाण्याचा वेळ आणि श्रम वाचण्यासाठी जवळच सेवा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू केल्याचे कुलगुरू म्हणाले. विविध राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या पाठपुराव्यामुळे हे केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीसीयूडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले की, दोन महिन्यांत सर्व तांत्रिक बाबी पूर्ण होऊन सार्‍या सुविधाही मिळणे सुरू होईल. मनुष्यबळासाठी मविप्र चार, महात्मा गांधी विद्यामंदिरतर्फे चार आणि इतर संस्थांच्या माध्यमातून दोन कर्मचारी मिळणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
कुलसचिव नरेंद्र कडू, उपकेंद्र सल्लागार समितीचे अध्यक्ष जी. के. खराटे, अशोक सावंत, मृणाल भारद्वाज, डॉ. एस. आर. निकम, प्राचार्य डॉ. सुचिता कोचरगावकर, हरीश आडके, डॉ. मिलिंद वाघ, बी. जी. वाघ, डी. बी. शिंदे यांच्यासह प्राचार्य अश्विनीकुमार भारद्वाज, मनविसेचे प्रदेशाध्यक्ष खंडेराव मेढे, जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, कैलास खांडबहाले आदी उपस्थित होते.
ई-ग्रंथालयातून ई-बुक्स
डिजिटल ग्रंथालयामुळे देशातील व जगभरातील नामवंत र्जनल्स व नामांकित प्रकाशकांचे ई-बुक्स येथे उपलब्ध होतील. लवकरच हे संगणक प्रत्येक महाविद्यालयास जोडून देऊन आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल.
केंद्रात या सुविधा
पात्रता अर्ज भरणे, पदवी प्रमाणपत्र, स्थानांतरण प्रमाणपत्र, दुय्यम गुणपत्रक, बहि:स्थ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, पदवी प्रमाणपत्र तसेच त्यांचे अर्जही येथूनही भरण्याची आणि कागदपत्रे तपासणीची व्यवस्थाही येथेच असेल.
महाविद्यालय-विद्यापीठ संयुक्त खर्च
हा उपक्रम अत्यंत खर्चिकही आहे. त्यामुळे विद्यापीठ 50 टक्के खर्च करेल आणि 50 टक्के खर्च महाविद्यालयांकडून घेतला जाणार आहे.
200 महाविद्यालयांत काही वर्ग
एकाच वेळी हा वर्ग सर्वच महाविद्यालयांत सुरू करणे शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठ, उपकेंद्र व 200 महाविद्यालयांत प्रथम वर्ग सुरू केला जाईल. त्यानंतर पुढच्या टप्प्यात दुसरी 200 महाविद्यालये निवडली जातील. हे सारे निदरेष कार्यरत झाल्यास उर्वरित सर्वच महाविद्यालयांत वर्ग सुरू केला जाईल.