नाशिक- वाहतुकीचेनियम पाळा अपघात टाळा, वेग कमी जीवनाची हमी, पेट्राेल बचाए कल को बेहतर बनाए... अशा घोषणा देत प्रयास सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि. २१) शहरातील प्रमुख सिग्नल चौकांत रस्ता सुरक्षिततेबाबत वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आला असून, छोट्या-मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रयास सामाजिक संस्थेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
सकाळी आठ वाजता संस्थेतर्फे या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. गडकरी चौक, त्र्यंबक नाका सिग्नल, मुंबई नाका परिसरात संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमार्फत फलकांद्वारे जनजागृती करण्यात आली. शहरातील सर्वाधिक वाहतूक या भागातूनच होते. मात्र, तरीही अनेक वाहनचालकांकडून येथे नियमांचे उल्लंघन केले जाताना दिसते. वाहतूक पोलिस असूनही अनेक जण भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रयास संस्थेच्या सदस्यांनी सिग्नलवर उभे राहून फलकांद्वारे जनजागृती केली.
संस्थेच्या अभियानाला वाहनधारकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वाहनधारकांनी सिग्नलवर
आपले वाहन बंद करून विद्यार्थ्यांसमोर पेट्रोल बचतीची शपथ घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल खंडाळकर, अरविंद नायडू, राहुल रसाळ, अमन थापा, शुभम पगार, तेज सिंह, क्षितिज पवार, आदित्य प्रसाद, सोनल चहाले, विवेक वर्मा आदी उपस्थित होते.
स्वच्छतेबाबतही दिला संदेश
यावेळी अनेक भागात ‘प्रयास’तर्फे स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात आली. सिग्नलवर गुटखा, तंबाखू, कागदाचे तुकडे, रिकाम्या कॅरिबॅग जमा करून स्वच्छता करण्यात आली.स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.