आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Egatpuri Education Department Office Position In Rani Session

शिक्षण विभाग कार्यालयास ताडपत्रीचा आधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी - शासन शिक्षणासाठी राज्यात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना तसेच सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून खासगी शिक्षण संस्थांशी स्पर्धा करण्यासाठी विविध योजना राबवित असताना इगतपुरी तालुक्यातील शिक्षणाची सर्व धुरा सांभाळणार्‍या पंचायत समितीतील शिक्षण विभागात गटशिक्षण अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍यांना गळणार्‍या पाण्यापासून कागदपत्राचे संरक्षण करण्यासाठी केविलवाणी धडपड करावी लागत आहे.
या दालनाचे छत पावसाळ्यात गळत असल्याने प्रत्येक पावसाळ्यात या छताला प्लास्टिक ताडपत्रीचा आधार देण्यात येतो. ताडपत्रीत साचलेले पाणी खिडकीतून बाहेर काढण्यात येते. इगतपुरी तालुक्यातील 222 प्राथमिक शाळांचा कारभार पाहण्यासाठी इगतपुरी पंचायत समिती आवारात असलेल्या शिक्षण विभागाच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. या इमारती जीर्ण झाल्याने पावसाळ्यात जागोजागी गळत आहे. गटशिक्षण अधिकार्‍यांच्या दालनात तर साधी बसायलाही जागा नाही. जोराचा पाऊस आला तर दालनात धो-धो पाणी पडत आहे. या पाण्यापासून कागदपत्रांचे रक्षण करण्यासाठी कर्मचार्‍यांना धडपड करावी लागत आहे. हीच अवस्था कर्मचार्‍यांच्या दालनाची व सर्व शिक्षा कार्यालयाची आहे.
इगतपुरी पंचायत समितीतील सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत. कित्येक वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती नसल्याने या इमारतीमधून पाणी येत आहे, तर काही ठिकाणी स्लॅब ठिकठिकाणी अकस्मात कोसळत आहे. जिल्हय़ात अन्य ठिकाणी पंचायत समितीच्या सुसज्ज इमारती आहेत; पण इगतपुरीसारख्या आदिवासी तालुक्यात मात्र जुन्या इमारतीची चाळण झालेली असताना या इमारती दुरुस्तीबाबत शासन कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने नागरिक व कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत.
या विभागांना लागते गळती
लघुपाटबंधारे कार्यालय
गटविकास अधिकारी कार्यालय
पंचायत समिती केबीन
नवीन इमारतीची मंजुरी अंतिम टप्प्यात - पंचायत समितीसाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. राहुल गावडे, गटविकास अधिकारी, इगतपुरी