आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदनिमित्त विशेष दुआपठण, शहरात ईद-उल्-अज्हा अर्थात बकरी ईद पारंपरिक उत्साहात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरपरिसरात मुस्लिम बांधवांचा त्याग बलिदानाचा सण ईद-उल्-अज्हा अर्थात,बकरी ईद शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह येथे सकाळी १० वाजता खतिब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन खतिब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण झाले. देशात शांतता नांदावी यासाठी, तसेच मक्केतील चंेगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांसाठी विशेष दुआपठण करण्यात आले.

हजरत इब्राहिम अलैहीस्लाम त्यांचे पुत्र हजरत इस्माइल अलैहीस्लाम यांच्या त्याग बलिदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईद सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. दरम्यान, ईदगाह मैदानावर नमाज अदा करून समाजबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी मुस्लिम बांधवांसाठी धार्मिक प्रवचन दिले. नमाज अदा केल्यानंतर समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

नमाजपठणानंतर रसूलबाग कब्रस्तान येथे दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहरातील बडी दर्गा भागातील सूफी संत शहेनशाह-ए-नाशिक सय्यद सादिक शहा हुसैनी बाबा यांच्या दर्ग्यावर जाऊन देशात शांतता नादांवी, जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली.

शाहजहाँनी ईदगाह येथे शुक्रवारी सकाळी ईद-उल्-अज्हा अर्थात बकरी ईदनिमित्त खतिब-ए-शहर हाफीज हिसामुद्दिन खतिब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण करताना मुस्लिम समाजबांधव.

..या मशिदींत झाली नमाज
शहरातील खडकाळी मशीद, शाही मशीद, हेलबावडी मशीद, दुधाधारी कथडा मशीद, मुलतानपुरा मशीद, आयेशा मशीद, वडाळागावातील फिरदौस मशीद, अजमेरी मशीद यांच्यासह शहरातील विविध मशिदींत ईद-उल्-अज्हाचे खास सामुदायिक नमाजपठण झाले.