आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांनी खेळण्‍यासाठी दिलेला फुगा गिळल्याने 8 महिन्‍यांच्‍या बाळाचा कोंडला श्‍वास, उपचाराअाधीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- खेळायला दिलेला फुगा घशात अडकल्याने अाठ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिडकोतील हनुमान चौक परिसरात घडली. वडिलांच्या हा प्रकार लक्षात येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार करण्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, लहान मुलांचे संगाेपन करताना त्यांना खेळण्यासाठी द्यावयाच्या वस्तू निवडण्याबाबत पालकांनी विशेष सतर्कता बाळगली पाहिजे, असे मतही तज्ज्ञ जाणकारांकडून मांडले जात अाहे. 

विनोद जयस्वाल हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत सिडकाेत राहतात. मूळ उत्तर प्रदेशचे जयस्वाल उदरनिर्वाहासाठी नाशिकमध्ये आले. फळ विक्रीचा व्यवसाय करून त्यांनी संसाराचा गाडा उभा केला. त्यांना एक मुलगी आहे. त्यानंतर पुत्ररत्न झाल्याने जयस्वाल कुटुंबीयांच्या अानंदाला पारावार उरला नाही. अतिशय गाेंडस अाणि बाळसेदार असलेल्या या मुलाचे नाव ‘वीर’ ठेवले. सतत हसरा अाणि खेळकर असलेला वीर शेजाऱ्या-पाजाऱ्यांचा लाडका होता. घरात तर त्याचे माेठेच काेडकाैैतुक. वीर सर्वांच्या अंगाखांद्यावर खेळायचा. 

गुरुवारी (दि. १०) आईला बाहेर कामानिमित जायचे होते म्हणून तिने वडिलांकडे त्याला सांभाळायला दिले. त्याने रडू नये म्हणून वडिलांनी त्याला फुगा खेळायला दिला. फुगा खेळत असतानाच वीरने तो तोंडात घेतला क्षणार्धात गिळला. हा प्रकार वडिलांच्या लगेच लक्षात आला. त्यांनी तो काढण्याचा प्रयत्नही केला. पण, तो निष्फळ ठरला. त्यांनी वीरला तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. धावपळ करून कुटुंबीयांनी तातडीने शासकीय रुग्णालय गाठले; मात्र उपचार मिळण्यापूर्वीच वीरची प्राणज्योत मालविली होती. जयस्वाल कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगरच काेसळला. परिसरातील मित्र-स्वकीय त्यांचे सांत्वन करीत हाेते; मात्र लाडका वीर काही मिनिटांत साेडून गेल्याने जयस्वाल कुटुंबीयांना सावरणे कठीण झाले हाेते.  अंबड पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. 
 
वीरच्या श्वासनलिकेत फुगा अडकला अाणि... : वीरला त्याच्या वडिलांनी खेळायला फुगा दिला. फुगा खेळताना मुले तो तोंडात घालतात. असेच वीर करीत होता. खेळत असताना फुग्यातील हवा गेली आणि त्याने पूर्ण फुगा तोंडात घेतला. तो थेट श्वास नलिकेत गेला. तेथे ताे अडकल्यानंतर वीरला श्वास घेण्यास अडथळा झाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 
 
तत्काळ प्रथमोचार करा, अन‌् डाॅक्टरकडे न्या... 
विशेषत: तीन वर्षांखालील मुलांना छोटी खेळणी देऊच नयेत. छोटे बॉल, बटन, डॉलर, लहान फुगे अशी खेळणी मुले तोंडात घालतात आणि त्यांना त्याचा त्रास होऊ लागतो. असा कोणताही प्रकार घडल्यास तत्काळ प्रथमोपचार करावेत. मुलाला उलटे करून त्याच्या पाठीवर थाप मारावी आणि तत्काळ डॉक्टरांकडे न्यावे. - डॉ.आनंद पवार, न्यायवैद्यकीय विशेषज्ञ, शासकीय रुग्णालय 
 
फुग्यात असताे धोकादायक वायू 
रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या फुग्यात धोकादायक वायू भरले जातात. ते लहान मुलांसाठी अतिशय घातक आहेत. त्यामुळे हे फुगे मुलांना खेळायला देऊच नयेत. शिवाय, लहान मुले रडू नये म्हणून त्यांना रस्त्यांवरील खेळणे देणे हा पर्याय होऊ शकत नाही. आई-वडिलांनी मुलांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी कोणतीही घटना घडल्यास तत्काळ डॉक्टरांकडे न्यावे. 
- डॉ. राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ 
 
 
बातम्या आणखी आहेत...