आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंटी-बबलीकडून भरदिवसा वृद्धाची लूट, बनावट रिव्हॉल्व्हर चाकूचा दाखवला धाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर - सातपूर भागात भरवस्तीत नीळकंठेश्वरनगर भागात राहणाऱ्या एका वृद्धाच्या घरात घुसून हिंदी चित्रपटातील बंटी-बबलीप्रमाणे बनावट रिव्हॉल्व्हर चाकूचा धाक दाखवित हजारो रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकाराने रहिवाशांमध्ये दहशत निर्माण झाली असून, संशयित युवक-युवती दोन दिवसांपासून परिसराची रेकी करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
सातपूर पोलिस ठाण्यात शंकर निंबा बोरसे (६६) यांच्या फिर्यादीनुसार लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूरच्या नीळकंठेश्वर भागातील ‘श्रीकुंज’ बंगल्यात राहणारे बोरसे हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी एकटे बसलेले होते. त्याच वेळी अचानक संशयित युवक-युवतीने घरात प्रवेश करून बोरसे यांच्या गळ्याला रिव्हॉल्व्हर लावून समोरच्या खुर्चीत त्यांना बसविले. त्याच वेळी घरातीलच साडी उचलून घेत दोघांनी त्यांचे खुर्चीला हात-पाय बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीतही बोरसे यांनी संशयितांचा प्रतिकार करीत आरडाओरड सुरू केली. हे बघून संशयिताने त्यांच्या तोंडात बोळा कोंबण्याचा प्रयत्न केल्यावरही बोरसे यांनी डगमगता त्याच्या हाताला कडकडून चावा घेताच त्याने झटक्यात हात सोडवून घेतला. हा प्रकार सुरू असतानाच दुसरीकडे युवतीने घरातील कपाटातून दागिने, रोकड काढून घेत पिशवीत भरून पळ काढला. त्यानंतर बोरसे यांनी स्वत: खुर्ची ढकलत नेऊन मोबाइलवर पत्नीला कॉल केला. हा प्रकार त्यांना समजताच त्यांनी शेजारपाजाऱ्यांना सोबत घेत घर गाठले. ही घटना सातपूर पोलिसांना कळविताच वरिष्ठ निरीक्षक मनोज करंजे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापाठोपाठ सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनीही माहिती घेतली.

खर्चासाठी८० रुपये
संशयित जोडप्याने घरातील ऐवज पिशवीत भरून बोरसे यांच्यासमोरच टेबलावर असलेल्या पाकिटातून १५०० रुपये काढून घेत सुट्टे ८० रुपये बाबा तुम्हाला खर्चासाठी ठेवून जातो, असे म्हणत जणू बोरसे यांच्याकडे पाहुणे आल्याच्या थाटात लूटमार करून घराबाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या जोडीला दोन दिवसांपूर्वीच बेारसे यांच्या बंगल्यात येऊन त्यांच्याच भाडेकरूंकडे त्यांच्याविषयी चौकशी केल्याचेही भाडेकरूंनी सांगितले, तर या भागात ते फिरत असल्याची माहिती रहिवाशांनी घटनेनंतर सांगितले. गेल्या महिन्याभरात या भागात चार ते पाच चोरीच्या घटना घडल्या असून, एकही घटना उघडकीस आल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बोरसे यांच्या शौर्याचे कौतुक
दरम्यान,बोरसे यांच्या घरात घुसून त्यांना शस्त्राचा धाक दाखविला तरीही ते थोडे देखील डगमगले नाहीत. याउलट संधी मिळताच संशयिताच्या हाताला चावा घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत बोरसे यांनी दाखविलेल्या धाडसाचे पोलिसांसह परिसरातील रहिवाशांनी कौतुक केले.

पोलिसांकडून नेहमीच असहकार्य
स्थानिकरहिवाशांनी एकत्रित येऊन याच परिसरात चोरी करणाऱ्या एका संशयितास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याला सोडून दिले. विशेष म्हणजे या प्रकारानंतर परिसरात कुठलीही गस्त वाढविली नाही. सुरक्षिततेसाठी आम्हीच रहिवासीयांनी दोन सुरक्षारक्षक ठेवले आहेत. -डॉ. सुदाम चौधरी