आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडीलधार्‍यांची भूमिका महादेवाप्रमाणे असावी; संजय मालपाणी यांचा पालकांना सल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महादेव म्हणजे पालकत्वाचा आदर्श असून, घरातील वडीलधार्‍यांनी महादेवाप्रमाणे आपले वागणे ठेवावे, असे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी केले. कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत राहून त्यावर योग्य तोडगा काढावा आणि सातत्याने चिंता नव्हे, तर चिंतन करून योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जैन सोशल ग्रुपतर्फे रविवारी आयोजित ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ कार्यक्रमात पालकांनी मुलांशी कसे वागावे आणि त्यांना कशाप्रकारे समजून घ्यावे, हे सांगताना ते बोलत होते. या वेळी मालपाणी यांनी पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधन त्यांना बोलते केले. शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी अनेक पालकांनी मुले मोबाइलचा गैरवापर करतात, असा आक्षेप घेतला. त्यावर अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि चलाखीने उत्तरे दिली. काही विद्यार्थी म्हणाले की, मोबाइलचा वापर आम्ही केवळ मनोरंजनासाठी करत नाही, तर त्यावर अभ्यासाविषयी चर्चाही सुरू असते. मोबाइलप्रमाणेच फास्टफूडच्या वाढत्या प्रमाणाबाबतही पालकांनी चिंता व्यक्त केली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मालपाणी म्हणाले की, पालकांनी कमीत कमी अर्धा तास मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. म्हणजे मुलांच्या तुमच्यासाठी असलेल्या तक्रारींचे निरसन होईल. संवादातूनच विसंवाद नाहीसा होऊ शकतो. जेव्हा मुलांना तुमच्याशी बोलायला वेळ असतो, त्यावेळी तुम्ही कोणत्याही कामात व्यस्त न राहता त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. टीव्हीवरील सिरिअल्स टाळून माता मुलांसाठी बराच वेळ देऊ शकतात, हे लक्षात ठेवायला हवे.
कार्यक्रमाला संस्थेचे समन्वयक प्रफुल्ल बरडिया, प्राजक्त मेहता, सतीश संघवी, मनीष छाजेड, संगीता चंडालिया, मधुबाला बेदमुथा, सुवर्णा चोपडा, विकीशा ओस्तवाल, अंकिता कुचेरिया आदी सदस्य उपस्थित होते.