आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्याच्या मतदार यादीत त्रुटी, निवडणूक आयुक्तांची कबुली; जबाबदारी महापालिकांची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मतदारांची नावे गहाळ होणे, नावे न सापडणे किंवा पत्ते बदलणे या मतदार यादीतील त्रुटी कमी करण्याची जबाबदारी महापालिकांवर टाकण्यात आल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
 
येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सालाबादप्रमाणे याद्या अद्ययावत करण्यास सुरुवात होईल. मागील (२०१४ व २०१७) दोन निवडणुकांत मतदार याद्यांची पडताळणी करणाऱ्या महापालिकांच्या बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी आता पुन्हा घरोघरी जाऊन मतदारांची नावे आणि त्यांचे पत्ते यांची पडताळणी केली तर दोन-तीन भेटींत मतदार यादी निर्दोष होऊ शकते, असेही ते म्हणाले. सध्याच्या मतदार यादीत त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य केले.    
 
१९९२ मध्ये  ७३ व्या व ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे अस्तित्वात आलेल्या ‘त्रिस्तरीय पंचायत राज’ व्यवस्थेस यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १४-१५ सप्टेंबर रोजी मुंबईत ही परिषद होत आहे. राज्यपाल विद्यासागर राव याचे उद््घाटन करतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समारोप होणार आहे.
 
या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत कार्यरत संशोधक, अभ्यासक यांना निवडणूक आयोग एकत्र आणीत आहे. सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचे संबंध सध्या कसे आहेत, कसे असायला हवेत, मनुष्यबळ, निधी आणि अधिकार याबाबतचे त्यांचे प्रश्न काय आहेत, ते सोडवण्यासाठीच्या उपाययोजना काय आहेत, याबाबत या राष्ट्रीय परिषदेत  चर्चा करण्यात येणार आहे. त्यातून येणाऱ्या सूचनांनुसार राज्याच्या अखत्यारीतील उपाययोजनांवर कार्यवाही करण्याची विनंती आम्ही शासनास करू, तर आमच्या अखत्यारीतील उपाययोजनांची त्वरित कार्यवाही करू. लोकांचा थेट सहभाग असलेल्या आणि लोकशाहीचा केंद्रबिंदू असलेल्या स्थानिक संस्था सक्षम व्हाव्यात हाच यामागील उद्देश आहे.

चर्चासत्रांचे आयोजन
स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने निधी, अधिकार आणि कार्यपद्धती याविषयी विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह पंचायत राज या विषयातील देशभरातील तज्ज्ञ आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...