आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Effect On School Mid Term Exam In Maharashtra

निवडणूक कामांमुळे ‘सहामाही’ अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभा निवडणूक १५ ऑक्टोबरला होणार असल्याने माध्यमिक शाळांच्या परीक्षा व प्राथमिक शाळांच्या मूल्यमापन नियोजनात बदल करावे लागणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर परीक्षा तारखांबाबत निर्णय घेण्याबाबत शिक्षण विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीच्या सुट्यांमुळे यंदा १८ ऑक्टोबर हा कामकाजाचा शेवटचा दिवस राहणार आहे. त्यामुळे बहुतांश शाळांनी पहिल्या सत्रातील परीक्षा व मूल्यमापनाचीही तयारी केली आहेत. आयोगाकडून शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले जाते. त्यासाठी दोन प्रशिक्षणे देऊन मतदानाच्या एक दिवस अगोदरच त्यांना शाळेतून सोडले जाते. त्यामुळे चार दिवस ते शाळेत येऊ शकणार नाहीत.
जवळपास सर्वच शिक्षकांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली जाते. परीक्षेच्या दिवशी शिक्षकच नसतील, तर मूल्यमापन होणार कसे, असा प्रश्न आहे. काही शाळांकडून स्थानिक पातळीवर मूल्यमापनाचे नियोजन केले जाते.

इतर शाळांमध्ये मात्र हा प्रश्न निर्माण होणार आहे. दोन प्रशिक्षणे, मतदानाचा व त्याअगोदरचा एक दिवस असे चार दिवस शिक्षक शाळेत राहणार नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाकडून शैक्षणिक कामकाजाच्या चार दिवसांचे नियोजन करण्याबाबत मुख्याध्यापकांना निर्देश दिले पाहिजे.

शिक्षण विभागाकडून आदेशच नाही..
कोणत्याही निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग शिक्षकांना निवडणुकीचे काम देते. दोन प्रशिक्षणे, निवडणूक मतदानाच्या एक दिवस अगोदरच त्यांना शाळेतून सोडले जाते. त्यासाठी शिक्षण विभाग निवडणूक जाहीर झाल्यानंतर शाळांना परिपत्रकाद्वारे आदेश काढतो. विधानसभा निवडणूक घोषणा होऊन तीन दिवस उलटूनही शाळांना कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही.

चर्चा करणार..
परीक्षा व विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने परीक्षेच्या दिवशी शिक्षकच शाळेत नसतील, तर मूल्यमापन होणार कसे? यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करणार रमेश अहिरे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा संघटना

शिक्षकांचा अधिकार
वेळापत्रक व परीक्षा घेण्याचा अधिकार शिक्षक व मुख्याध्यापक यांचा असतो. निवडणूक परीक्षा काळात आल्याने वेळापत्रक बदलू शकतात. सद्यपरिस्थिती बघता ८-९ ऑक्टोबर नंतरच परीक्षा सुरळीत होऊ शकतील. किरण कुंवर, प्रशासन अधिकारी, मनपा