आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोटावरील शाई दाखवा अन् औषध खरेदीत सूट मिळवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कमी होत जाणार्‍या मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू असताना, नाशिक रोड येथील एका मेडिकल व्यावसायिकानेही खारीचा वाटा उचलत ‘शाई दाखवा अन् सूट मिळवा’ उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केलेल्यांना कोणत्याही गोळ्या-औषधांच्या खरेदीवर पाच टक्के सूट मिळणार आहे.

नाशिक रोड येथील मयूर मेडिकलचे संचालक दिनेश चोपडा यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. दिल्लीत पेट्रोलपंप चालकांनी याचप्रकारे पेट्रोलमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा उपक्रमांमुळे निदान ऑफर्सच्या आकर्षणामुळे तरी मतदानाचा टक्का वाढेल, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये 50 ते 60 टक्के मतदान होते. अर्थात बहुतांश मतदार मतदानाकडे पाठ फिरवत असल्याने, मताधिक्याअभावी कोणाचेही स्थिर शासन येत नाही व त्रिशंकू शासनामुळे विकासासाठी ठोस निर्णय घेणे अवघड बनते. बहुतांश उच्चशिक्षित, व्यापारी, अधिकारी आणि महिलावर्ग मतदान करत नसल्याने मतदारजागृतीसाठी सामाजिक संस्था व काही नागरिक वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, चोपडा यांनी औषध खरेदीवर सूट देत मतदारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे.

सामान्यांत जनजागृती करण्याचा प्रयत्न
- मतदान हा महत्त्वाचा हक्क आहे. त्यातूनच देशाचे भविष्य ठरत असते. मात्र, अनेक मतदार मतदानच करत नसल्याने एक प्रकारे देशावर अन्याय करतात. देशाचा विकास आणि चांगले शासन देण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. सर्वांनी मतदान करावे म्हणून दोन दिवस औषध खरेदीवर पाच टक्के सूट देणार आहे.- दिनेश चोपडा, मयूर मेडिकल

- निवडणूक आयोगाने कमीत कमी 75 टक्के मतदान होण्यासाठी कंबर कसली असून, पथनाट्ये, मेसेजेस व माहितीपत्रकांद्वारे मतदारांची जागृती केली जात आहे. विश्वास बँकेनेही माहितीपत्रकाद्वारे तीन माकडे दाखवून राजकारणावर तावातावाने नुसतीच पोकळ चर्चा करण्यापेक्षा किंवा राजकारणातील न पटणार्‍या गोष्टींवर प्रकाशझोत टाकत या गोष्टी कानाआड करा, डोळेझाक करा आणि गप्प बसा हे दाखवले आहे. हे जमणार नसेल तर मतदान करा आणि इतरांना प्रवृत्त करा, या प्रकारे जनजागृती सुरू केली आहे.