आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Nashik Election Issue, Divya Marathi

सिन्नरच्या सुपीक राजकीय भूमीत चांगल्या पिकासाठी सरसावले सर्वच उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- मशागत शेतातली असो व राजकारणातली, मेहनत तर घ्यावीच लागते. दोन्ही ठिकाणी उपद्रवी तण आणि जखमा देणार्‍या टोकदार काट्यांना अलगद दूर सारावे लागते. संपुष्टात आलेला रब्बी हंगाम आणि उंबरठय़ावरील लोकसभा निवडणुकीमुळे सध्या राजकीय मशागतीचीच चर्चा आहे.
नाशिक मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावणार्‍या सिन्नरच्या सुपीक राजकीय भूमीत चांगल्या पिकासाठी सर्वच उमेदवार सरसावले आहेत. अर्थात, त्यातही छगन भुजबळ यांनी मशागतीची अनेक आवर्तने पूर्ण केली आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कॉँग्रेसी पिकासमोर पर्यायी पीक घेण्यासाठी भुजबळ यांनी राजाभाऊ वाजे-उदय सांगळे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीचे हक्काचे बिजारोपण यशस्वीरीत्या केले. त्यावेळी दुखावलेल्या कोकाटेंना गोंजारण्यासाठीचे पर्यायही भुजबळ यांनी योजले होते. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवत भुजबळांनी कोकाटेंच्या रोषाचे हलाहल पचवले. कधी नव्हे एवढी सहनशक्ती व विविध शासकीय योजना मंजुरीचे खत घालून प्रतिकूल वाटणारी कोकाटे यांच्या प्रभावाखालील जमीनही सुपीक करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला.
गेल्या निवडणुकीत सेनेच्या दत्ता गायकवाडांचा प्रचार करणार्‍या नाशिक निवासी ज्येष्ठ नेत्यास निवडणूक तोंडावर आल्याच्या आठवडाभर आधीच आजाराने ग्रासले. त्याचा तोटा गायकवाड यांना व फायदा समीर भुजबळांना झाल्याची चर्चा जशी झाली, तसेच या कथित आजारास भुजबळांनी मशागतीसाठी टाकलेले तणनाशक कसे कारणीभूत ठरले याची चर्चाही रंगली. मशागतीची आधुनिक साधने, विविध प्रकारच्या रासायनिक व सेंद्रिय खतांची बेगमी आणि काटे व गवत दूर करण्यासाठी सज्जता सर्वच उमेदवारांना ठेवावी लागणार आहे.
पाखरे हुसकावण्याचे आव्हान
गेल्या निवडणुकीत फारशी मशागत न करताही मनसेच्या हेमंत गोडसेंना अनुकूल हवेच्या जोरावर मतांचे चांगले पीक घेता आले, तर सेनेच्या दत्ता गायकवाडांना चांगले पीक घेऊनही प्रत्यक्ष मतपेटीत उतारा मात्र कमी होता. यंदा गोडसेंना नातेगोते-संपर्काचे खत, मोदींची हवा आणि सहानुभूतीची सुपीक जमीन लाभली आहे. मधल्या काही काळाचा अपवाद सोडता मनसेच्या डॉ. प्रदीप पवारांनी संपर्काच्या फेर्‍या चालू ठेवल्या आहेत. दुसर्‍याच्या तयार मतांच्या पिकावर डल्ला मारण्यात ऐनवेळी जो यशस्वी होतो त्याला विजयाजवळ जाता येते. त्यामुळे तयार पिकातले दाणे टिपण्यास येणारी पाखरे हुसकावण्याचे आव्हानही आहेच.