आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष कार्यालये ओस; नेते अज्ञातस्थळी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्ष कार्यालय गजबजतील, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र, पक्षांची मुख्यालये ओस पडल्याचे चित्र आहे. युती वा आघाडीचे सध्याही भिजत घोंगडे असल्याने या संदर्भातील चर्चेसाठी नेते अज्ञातस्थळी बैठका घेण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्ष कार्यालयात नियोजनासाठी नेते, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांची गर्दी होणे स्वाभाविकच आहे. मात्र, निवडणूक जाहीर होऊन जवळपास एक आठवडा उलटल्यानंतरही पक्ष कार्यालयांमधील गर्दी वाढलेली नाही. शिवसेना व भाजप युती तसेच कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहे. जागावाटपाबाबत नेत्यांमध्ये बोलणी सुरू असल्यामुळे तसेच यासंदर्भातील चर्चेसाठी स्थानिक पदाधिकारीही अज्ञातस्थळीच बैठका घेत असल्यामुळे पक्ष कार्यालयात केवळ उमेदवारी अर्ज जमा करणे, वाटप करणे आदी कारकुनीची कामे सुरू असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करण्यासाठी प्रशासनाकडून झेंडे, ध्वज, मिरवणूक, सभांची परवानगी घेण्यासाठी कार्यकर्ते धावपळ करीत असल्यामुळे पक्ष कार्यालयात शुकशुकाट दिसत असल्याचेही सांगण्यात आले.
कार्यालयात नियोजन करणे कठीण - पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेताना गुप्तता पाळावी लागते. चर्चेसाठी एकांताची गरज असते. पक्ष कार्यालयात पदाधिकारी व नेते जमले की, कार्यकर्त्यांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयात बसून नियोजन करणे कठीण होते. या पार्श्वभूमीवर अज्ञातस्थळी महत्त्वाचे नेते चर्चा करून निर्णयासंदर्भातील माहिती कार्यकर्त्यांना देतात. - अर्जुन टिळे, महानगरप्रमुख, शिवसेना