आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रक्रियेतील कर्मचार्‍यांचे मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी कार्यरत सरकारी कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 18) आपला मतदानाचा हक्क बजावला. दादासाहेब गायकवाड सभागृहात यासाठी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. नाशिकरोड -देवळाली विधानसभा मतदारसंघातील कर्मचार्‍यांनी येथे आपले मतदान केले, तर काहींनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.
येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविणार्‍या कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय कर्मचार्‍यांना ईव्हीएम मशीन तपासणी व हाताळणी अशी संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात येत आहे. केंद्र 126 म्हणजेच नाशिकरोड -देवळाली विधानसभा मतदारसंघातील कर्मचार्‍यांना सकाळ व दुपार अशा दोन सत्रात शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले. या मतदारसंघासाठी पाच कर्मचारी समाविष्ट असलेल्या एकूण 257 टीम सहभागी झाल्या होत्या. हे कर्मचारी मतदानाच्या दिवशी म्हणजे 24 एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविणार असल्याने त्यांच्यासाठी शुक्रवारी येथेच मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली होती. प्रशिक्षणासाठी आलेल्या कर्मचार्‍यांनी आपले मतदान या वेळी केले. मतदार या वेळी 12 क्रमांकाचा अर्ज भरून अधिकार्‍याने प्रमाणित केल्यानंतर मतदान करण्यात येते. तर ज्या कर्मचार्‍यांना पोस्टल मतदान करावयाचे आहे, त्यांनी अर्ज नेले असून, घरातूनच पोस्टाद्वारे मतदान करण्यात येणार आहे. सदर पाकिटे ही येथेच जमा करून घेणार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी दीपमाला चौरे यांनी दिली.