आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक बुडाले अंधारात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/नाशिकरोड - पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच महावितरणच्या कामांचा बोजवारा उडून अनेक तास वीजपुरवठा खंडित झाल्याने बहुतांश शहरवासीयांच्या संयमाची मंगळवारी रात्री व बुधवारीही परीक्षाच पाहिली गेली. अमृतधाम परिसरातील दुर्गानगरमध्ये तर तब्बल 29 तासांत महावितरणला विद्युत पुरवठा सुरळीत करता आला नाही.

महावितरणतर्फे विद्युत तारांवर येणार्‍या झाडांच्या फांद्या तोडणे, रोहित्रातील ऑईल तपासणे, उपकरणे दुरुस्त करणे, विद्युत तारा ओढणे आदी कामे करण्यात आली. मात्र, जोरदार पावसामुळे या मान्सूनपूर्व कामांची दाणादाण उडाली. घोंघावणार्‍या वार्‍यामुळे ठिकठिकाणी वीजतारा तुटल्या. तारांना तारांचे घर्षण झाल्याने अनेक ठिकाणी पुरवठा खंडित झाला

रात्री उशिरापर्यंत 95 टक्के परिसरातील पुरवठा पूर्ववत करून उर्वरित परिसरातील पुरवठा बुधवारी सकाळी पूर्ववत केल्याचा दावा महावितरणच्या सूत्रांनी केला. बुधवारी नाशिक, नाशिकरोड परिसरातील काही भागात पाच तासांपेक्षा अधिक काळ पुरवठा खंडित राहिला.
तपोवनात एकाचा मृत्यू : मंगळवारी मुसळधार पावसामुळे वीजतार पाण्यात पडून तपोवन परिसरातील रामचंद्र हरी मोरे (60) यांचा मृत्यू झाला.
रोहित्राला शॉर्टसर्किटने आग
जुन्या नाशकातील खडकाळीत जीन मंझीलजवळ असलेल्या रोहित्राला बुधवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. मंगळवारच्या वादळी पावसाने जुन्या नाशकातील खंडित झालेला वीजपुरवठा मध्यरात्री काही काळ सुरळीत होऊन पुन्हा बुधवारी रात्रीपर्यंत खंडित झाला. विजेअभावी काही सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा झाला नाही. वार्‍यामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडल्या. रोहित्र बंद पडल्याने बागवानपुरा, कथडा, नानावली, पाटील गल्ली, कुंभारवाडा, नाईकवाडीपुरा, खडकाळी, गंजमाळ, बडी दर्गा परिसर बुधवारीही अंधारात होता.
जाहिरात फलक कोसळला
जुने नाशिकसह वडाळागाव येथे जुने वृक्ष कोसळले, तर सारडा सर्कल परिसरातील मधुमालती संकुलावरील जाहिरात फलक रस्त्यावरच कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. काठे गल्ली, गाडगे महाराज वसाहत येथे घरांवरील पत्रे उडाले, तसेच र्शीरामकुंज सोसायटी व गणेशनगर परिसरातही नुकसान झाले. जुने नाशिकमधील हजरत गाजी शाहबाबा चौक येथे मोठा वृक्ष कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. खडकाळी सिग्नल ते दूध बाजारदरम्यान संपूर्ण रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत होते.