आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electrical Cluster Dream Come Into Reality At Nashik

इलेक्ट्रिकल क्लस्टरचे स्वप्न नाशिकमध्ये दृष्टिपथात येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - नाशिक येथील इलेक्ट्रिकल उद्योगांना आपली उत्पादित उपकरणे तपासणीसाठी सध्या भोपाळ व बंगळुरू येथे जावे लागते. त्यामुळे वेळ व पैशांचा मोठा अपव्यय होत असल्यामुळे नाशिकला ‘इलेक्ट्रिकल क्लस्टर’ स्थापन करण्याची उद्योजकांची मागणी आहे. त्यामुळे येथील भौगोलिक स्थिती आणि जागेच्या उपलब्धतेची चाचपणी करण्यासाठी सीपीआरआय या बंगळुरूस्थित केंद्रीय मंत्रालयाअंतर्गत सुरू असलेल्या संस्थेचे संचालक मुरूगेशन आणि भोपाळ येथील अतिरिक्त संचालक राघवय्या शनिवारी नाशकात येत आहेत.

या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ या अधिकार्‍यांशी चर्चा करतील. बैठक सकारात्मक झाल्यास ऊर्जा क्षेत्रातील शेकडो कोटींची गुंतवणूक येण्याची चिन्हे असून, त्याकडे उद्योग जगताचे लक्ष लागून आहे.


इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबसाठी नाशिकमध्ये होणार चाचपणी
या क्लस्टर प्रकरणी खासदार समीर भुजबळ यांनी पाठपुरावा केला होता.सातपूर व अंबड औद्योगिक क्षेत्रात सुमारे साडेचारशे लघु आणि मध्यम इलेक्ट्रिकल उद्योग आहेत. इलेक्ट्रिकल पॅनल्स तसेच इतर वीज उपकरणांची निर्मिती झाल्यानंतर त्याची टेस्टिंग व त्यांची उपयुक्तता तपासणी इर्डा व केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेमार्फत केली जाते. नाशिकमध्ये या उपकरणांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा, मशिनरी आणि प्रयोगशाळा उपलब्ध नसल्यामुळे उद्योजकांना सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उद्योजकांना संबंधित वस्तूची निर्मिती करण्यास विलंब लागतो. परिणामी वेळेत मागणी पूर्ण करण्यातही या उद्योगांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे चक्र थांबविण्यासाठी ही टेस्टिंग लॅब स्थापन झाल्यास सर्व अडचणी दूर होणार आहेत. नाशिकला हा प्रकल्प उभारण्याचे प्राथमिकदृष्ट्या निश्चित केल्याचे संकेत असून, उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


नाशकात 80 टक्के उत्पादन
इलेक्ट्रिकल उपकरणातील ब्रेकर व स्वीचगिअरचे देशातील 80 टक्के उत्पादन अंबड व सातपूर एमआयडीसीत होते. या उपकरणांच्या तपासणीसाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागतो. यात पैसा व वेळेचा अपव्यय होतो. ही लॅब झाल्यास नाशिकच्या विकासात मोठी भर पडणार आहे.‘वाइन कॅपिटल’ प्रमाणेच ‘इलेक्ट्रिकल कॅपिटल’ ही आणखी एक नवी ओळख निर्माण होऊ शकते.


विकासाला हातभार
टेस्टिंग लॅब नाशिकला झाल्यास शेकडो कोटींची गुंतवणूक होऊन नाशिकच्या विकासाला हातभार लागणार आहे. इलेक्ट्रिकल अभियंत्यांना रोजगाराच्या संधी मिळणार असून, लगतच्या गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील उत्पादनांना या लॅबचा फायदा होणार आहे म्हणून या लॅबसाठी प्रयत्नशील आहे. समीर भुजबळ, खासदार