आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहप्रवेशापूर्वीच वीजबिल आले भरमसाठ; नाशकातील घरकुल योजनेतील प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- घरकुल योजनेच्या 80 लाभार्थ्यांना दिमाखदार सोहळ्यात घरांचे वाटप झाले असले तरी, लोकार्पणानंतर घरांचे काम अर्धवटच असल्याचे लाभार्थींना समजले आणि हे कमी म्हणून की काय आता हजारो रुपयांचे वाढीव वीजबिल आल्याने त्यांना मोठाच धक्का बसला. घाईघाईत लोकार्पण करणार्‍या नगरसेवकांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आक्षेप घरकुलधारक घेत आहेत.
औरंगाबाद रोडवरील नीलगिरीबाग येथील घरकुलांचा लोकार्पण सोहळा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत थाटात करण्यात आला. त्यावेळी घोषणा झाली 750 घरकुल देण्याची, मात्र प्रत्यक्षात लोकार्पण अवघ्या 80 घरांचे झाले. आमदारकीचे डोहाळे लागलेल्या काँग्रेस नगरसेवकांची लगीनघाईच याला कारणीभूत ठरल्याची चर्चा होत आहे. प्रभागात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यास निमंत्रण दिले नसल्याने पक्षाच्या नगरसेविक सुनीता निमसे यांनीही नाराजी व्यक्त करत नाईलाजास्तव सोहळ्यास हजेरी लावली. वाटप करण्यात आलेल्या 80 घरांची कामे प्रलंबित असताना याच लाभार्थ्यांना आता वाढीव वीजबिले आल्याने आगीतून फुफाट्यात, अशी लाभार्थ्यांची परिस्थिती झाली आहे.
जवळच्यांना घरे दिली
घरकुलामध्ये नगरसेवकांनी चालक आणि जवळच्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना घरांचे वाटप केले असून, खरे लाभार्थी नाराज आहे. 20 वर्षांपासून स्थानिक असूनदेखील घरे मिळाली नाही. बोगस लोकांना घरांचे वाटप झाले आहे. विचारणा करण्यास गेल्यानंतर दमबाजी करण्यात आली. अशा विविध तक्रारी करत 100 नागरीकांनी नावे न छापण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त केली.

चौकशी करण्यात येईल
लाभार्थींना आलेल्या वाढीव वीजबिलांची चौकशी करण्यात येईल. याबाबत माहिती घेऊन वीजबिले कमी करून देण्यात येतील. अद्याप काही घरांची कामे प्रलंबित आहेत. त्यानंतर लोकार्पण झाले असते तर समस्या टळल्या असत्या.
-सुनीता निमसे, नगरसेविका प्रभाग 2