आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी, कालव्यात वीजनिर्मिती; देशात प्रथमच चिला कालव्यात वापरात येणार तंत्र,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जलविद्युतनिर्मिती प्रक्रियेसाठी प्रचंड वेगाने कोसळणारा जलप्रपात अथवा मोठमोठय़ा धरणांची गरज आता संपुष्टात येणार आहे. कारण अगदी कालव्यातील साध्या वाहत्या पाण्यातूनदेखील वीजनिर्मितीचे अत्यंत स्वस्त आणि मस्त तंत्रज्ञान विकसित करण्यात विक्रम राजाध्यक्ष या अमेरिकास्थित अनिवासी भारतीय उद्योजकाने आघाडी घेतली आहे. राजाध्यक्ष यांच्या डीएलझेड कंपनीने त्यासाठी अभिनव हायड्रोकायनेटिक टर्बाइन विकसित केले असून अमेरिकेत त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता येत्या एप्रिलमध्ये भारतात प्रथमच चिला कॅनॉल (उत्तरांचल) येथे हे तंत्र कार्यान्वित होणार आहे.

पारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक तसेच अजस्र साधनसामग्रीची आवश्यकता असते. जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठीदेखील आतापर्यंत मोठमोठी धरणे अथवा प्रचंड वेगाने कोसळणारा जलप्रपात यांची अनिवार्यता होती. त्यामुळे कुठलाही प्रकल्प उभारायचा म्हटला की, जमीन संपादनापासून ते मजबूत आर्थिक गुंतवणुकीपर्यंत सगळेच प्रश्न आ वासून उभे राहतात. एकीकडे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र अशा विविध कारणांमुळे तिच्या निर्मितीत अडथळे येत आहेत. परिणामी, विजेची मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढत असून सर्वसामान्यांना वीज अधिकाधिक दराने खरेदी करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कालवे अथवा नदीपात्रांमध्ये सहजपणे सामावू शकणार्‍या हायड्रोकायनेटिक टर्बाइन्सद्वारे वीज निर्मितीचा प्रकल्प म्हणजे क्रांतीकारी पाऊल ठरण्याची चिन्हे आहेत.

नद्या, नाले आणि कालव्यांनी समृद्ध असलेल्या प्रदेशांत तुलनेने अत्यल्प कालावधीत, अल्प खर्चात व हायड्रोकायनेटिक तत्त्वाद्वारे वीजनिर्मिती होऊ शकते. हे विचारात घेऊन डीएलझेड कंपनीने नावीन्यपूर्ण टर्बाइन विकसित केले असून त्यांना अमरिकेत नुकतेच पेटंटदेखील प्राप्त झाले आहे. सहजसाध्य अशा या तंत्रज्ञानाद्वारे अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प उभारला जाऊ शकतो, शिवाय या प्रक्रियेमध्ये पर्यावरण तसेच जलजीवनालादेखील कमीत कमी हानी पोहोचत असल्याचे विक्रम राजाध्यक्ष यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

‘हायड्रोकायनेटिक ’चे लाभ
पारंपरिक लहान वा मध्यम जलविद्युतनिर्मिती प्रकल्पांच्या तुलनेत हे नवे तंत्रज्ञान विविध दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. मुळात अशा प्रकल्पाच्या उभारणीसाठी धरण अथवा पाण्याचा प्रवाह वळवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. त्यामुळे बांधकाम व एकुणातच साधनसामग्री अत्यंत कमी लागते. पारंपरिक पद्धतीचा छोटा जलविद्युत प्रकल्प उभारायचे म्हटले तरी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. त्या तुलनेत या प्रकल्पाची उभारणी मात्र अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत होऊ शकते.