आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये कॅन्सरवर इलेक्ट्रोकिमोथेरपीचा उपचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये आणि त्याच्या आजूबाजूला एक हजार व्होल्टचा शॉक देऊन उपचार करण्याची इलेक्ट्रोथेरपी सोमवारी शहरात करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रकारच्या थेरपीकरिता वापरण्यात आलेले उपकरण हे देशातील एकमेव उपकरण असून, या प्रकारच्या केवळ पाच शस्त्रक्रिया यापूर्वी देशात करण्यात आल्या आहेत. कॅन्सर उपचारांकरिता अत्यंत प्रगत समजल्या जाणार्‍या मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये बुधवारी (दि. 25) पहिल्यांदा ही थेरपी वापरली जाणार आहे.

येथील क्युरी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या एका 24 वर्षीय युवतीवर सोमवारी या उपचारपद्धतीचा वापर करण्यात आला. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्यूमरवर इलेक्ट्रोकिमोथेरपी डॉ. राज नगरकर यांनी वापरली आहे.

यात ट्यूमरच्या आजूबाजूला आणि ट्यूमरच्या आतील बाजूस इलेक्ट्रॉनिक प्रोबद्वारे एक -एक हजार व्होल्टचा करंट चार ते साडेचार सेकंदाकरिता सोडला जातो. या प्रकारचा उपचार करण्यापूर्वी सात तास अगोदर किमोथेरपी औषधांचे इंजेक्शन दिले जाते. करंट जेव्हा ट्यूमरमध्ये जातो, त्यानंतर ट्यूमरच्या पेशी उघडल्या जातात आणि हे औषध ट्यूमरच्या या पेशींच्या आतपर्यंत जाते, ज्याचा परिणाम प्रभावी ठरतो आणि सात दिवसांत ट्यूमरचा आकार आश्चर्यकारकरीत्या घटतो.

या आजारात काही स्थितीत फायदा
गर्भाशयमुखाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, लाळग्रंथींचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, त्वचेचे आणि लघवी पिशवीचे कॅन्सर, प्रोस्टेड ग्रंथीचे कॅन्सर यात याचा फायदा काही विशिष्ट स्थितीत रुग्णाला मिळतो. कोणतीही शस्त्रक्रिया न करता किंवा ट्यूमर न काढता ही थेरपी करता येत असल्याने ती फायद्याची असून, आणखी दहा रुग्णांवर मोफत थेरपी करणार आहे.
-डॉ. राज नगरकर, संचालक, मानवता क्युरी सेंटर

या रुग्णांना फायदा
ज्या कॅन्सरग्रस्त रुग्णांवर यापूर्वी शस्त्रक्रिया, किमोथेरपी किंवा रेडीएशन उपचार करण्यात आले आहेत; पण तरीही कॅन्सर परतला आहे, अशा अनेक प्रकारातील रुग्णांसाठी ही उपचार पद्धती वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे, थेरपी द्यायची असेल तितक्यात भागाला भूल दिली जाते.