आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक: राज्य शासनाने मुंबई, पुण्यापाठोपाठ राज्यातील अन्य महानगरांमध्ये प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्याचे आदेश काढले असून, त्यानुसार नाशिकमध्ये 1 जुलैपासून सर्व जुन्या रिक्षांना मीटर बसविण्यात येणार आहेत, तर 1 मार्चपासून नवीन रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरशिवाय परवानगी मिळणार नाही. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने तयारी सुरू केली असली तरी त्यास रिक्षा संघटनांनी आताच विरोध दर्शविला आहे.
राज्य शासनाने तब्बल दहा वर्षांनतर ऑटोरिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेबाबत परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मार्चपासून नवीन रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरशिवाय परवानगी न देण्याचा आदेश काढण्यात आला आहे. जुन्या रिक्षांना 1 जुलैपर्यंत मीटर बसविणे अनिवार्य केले आहे.
अंमलबजावणी होणार
जुन्या रिक्षांना 1 जुलैपासून मीटर सक्तीचे करण्यात येणार आहे. या कालावधीत रिक्षाचालकांची जागृती करण्यात येणार असून, संघटनांना विश्वासात घेऊ. मीटरमुळे प्रवाशांची गैरसोय टाळून त्यांना योग्य भाड्यात प्रवास करता येणार असल्याने निश्चित अंमलबजावणी केली जाईल. चंद्रकांत खरटमल, परिवहन अधिकारी
शासननिर्णयास विरोध
हा निर्णय अयोग्य असून, इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची कुठलीही यंत्रणा शहरात उपलब्ध नसल्याने मीटर आणायचे कुठून? इतर शहरांमधून ते आणल्यास सहा-सात हजारांचा खर्च येऊ शकतो. या निर्णयाविरोधात आंदोलन केले जाईल. भगवंत पाठक, र्शमिक रिक्षाचालक संघटना
शासनाकडून धूळफेक
यापूर्वीही अनेक वेळा पोलिस मीटरची सक्ती करण्याचे आदेश काढले होते. मात्र, तसा प्रयत्नही झाला नसल्याने शहरातील 11 हजारपैकी एक टक्का रिक्षांमध्येदेखील मीटर सापडणार नाही. त्यामुळे नव्याने परिपत्रक काढून शासनाकडून धूळफेकच केली जात आहे. पी. एम. भगत, ग्राहक पंचायत संघटना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.