आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार तरुणांची रोजगारासाठी नोंदणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सारजाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सिटी सेंटर मॉल परिसरातील ठक्कर डोम येथे आयोजित केलेल्या जॉब फेअरमध्ये रविवारी (दि. 17) दुसर्‍या दिवशी राज्यभरातून तब्बल 5 हजार 750 तरुणांनी नावनोंदणी केली. नोंदणी केलेल्या एक हजार 150 तरुणांचा विविध कंपन्यांनी घेतलेल्या निवड चाचणीतून तयार करण्यात आलेल्या प्रथम यादीत समावेश करण्यात आला आहे. जॉब फेअरमध्ये रविवारी 80 बेरोजगारांची निवड करीत त्यांना थेट नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रथम यादीतील तरुणांना लवकरच कंपनीत बोलावून त्यांनाही नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

सारजाई चॅरिटेबल ट्रस्ट एम अ‍ॅण्ड एचआर सर्व्हिसेस आणि प्रज्ञा अ‍ॅड एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी नाशकात शनिवार आणि रविवारी दोनदिवसीय जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विविध क्षेत्रांतील 40 हून अधिक नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला. जॉब फेअरमध्ये राज्यभरातून पाच हजार 750 युवक-युवतींनी उपस्थित राहत नावनोंदणी केली. त्यातील एक हजार 150 जणांची प्राथमिक यादीतही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात प्रथमच नोकरीची संधी मिळविणार्‍या बारावीपासून ते पदव्युत्तरपर्यंतच्या जवळपास 300 ते 350 तरुणांचा समावेश आहे. विविध क्षेत्रांतील 40 हून अधिक नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतल्याचा फायदाही युवक-युवतींना झाला असल्याने अशा प्रकारच्या जॉब फेअरचे आयोजन नियमित राज्य व राष्ट्रीय स्तरावर व्हावे, अशी अपेक्षा या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या आस्थापनांनी घेतला सहभाग
जॉब फेअरमध्ये कर्मा कन्सलटन्ट, श्रीराम लाइफ इन्शुरन्स, एसबीआय लाइफ, प्रोजेक्ट सोल्यूशन, झेड टेक, डब्ल्यूएनएस, एनजीएन ओम टेक, एचयूएल लेबर नेट, रुंग्टा कन्स्ट्रक्शन, मर्चंट नेव्ही, सारडा ग्रुप आदी आयटी, सॉफ्टवेअर, बँकिंग, अभियांत्रिकी क्षेत्रांसह शासकीय आणि निमशासकीय जवळपास अशा 40 हून अधिक संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, सतीश बोरा, एमएनजी सर्व्हिसेसचे शेख यांनी जॉब फेअरचे संयोजन केले.
एकाच ठिकाणी संधी
सर्व प्रकारच्या नोकरीच्या संधी एकाच ठिकाणी असल्याने विविध संस्थांकरिता मुलाखत देत नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे मी समाधानी आहे.
अमी पंजवानी, युवती

नियमित आयोजन व्हावे
अत्यंत स्तुुत्य उपक्रम आहे. अशा उपक्रमाचे नियमित राज्य व राष्ट्रीय स्तरावर आयोजन करावे. त्याचा फायदा नक्कीच आमच्यासारख्या बेरोजगारांना होऊ शकेल.
ज्योती राठोड, बेरोजगार युवती