आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Empty Posts Issue In Divisional Office At Nahsik

राज्याचे पाच मंत्री काय रिकाम्या खुच्र्यांना आदेश देणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड-मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिक विभागीय कार्यालयात अडीच महिन्यांपासून विभागीय आयुक्त, आठ महिन्यांपासून अपर आयुक्त व विभागीय चौकशी अधिकारी ही महत्त्वपूर्ण पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अशा परिस्थितीत शुक्रवारी (दि.24) होणार्‍या आढावा बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी कोण करणार? उपमुख्यमंत्री व पाच जिल्ह्यांचे पालकमंत्री रिकाम्या खुच्र्यांना आदेश देणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विभागीय आयुक्त निवृत्त होण्यापूर्वी त्या पदावर नवीन आयुक्तांच्या नियुक्तीची परंपरा खंडित झाली आहे. विभागीय आयुक्त रवींद्र जाधव नोव्हेंबरअखेर निवृत्त झाल्यानंतर पालिका आयुक्त संजय खंदारे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला. दोन महत्त्वाच्या विभागाच्या कामाचा ताण पडत असल्याने पूर्णवेळ एकाही विभागाला त्यांना न्याय देता येत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्तांच्या गैरहजेरीत लोकशाही दिन पार पडला. दोन महिन्यात क्वचित येऊन दोन तासात कामांचा निपटारा ते करतात; मात्र इतर कामे प्रलंबित आहे. दुसरे महत्त्वाचे अपर आयुक्त, विभागीय चौकशी अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. त्यांचादेखील प्रभारी पदभार उपायुक्तांकडे सोपविण्यात आला आहे. जबाबदारी असलेल्या विभागाचे काम करताना मिळणार्‍या वेळेत उपायुक्त प्रभारी जबाबदारी असलेल्या पदाला न्याय देतात. मात्र, सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही. तत्कालीन अपर आयुक्त टी. के. बागुल यांच्या निवृत्तीनंतर आठ महिन्यांपासून शासनाला या पदावर अधिकार्‍यांची नेमणूक करता आलेली नाही. उपायुक्त अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. सात महिन्यांपासून शेतीविषयक प्रकरणे प्रलंबित आहेत. सामान्य नागरिक निर्णयाची वाट बघत आहेत; मात्र त्यांना पुढची तारीख मिळत आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यांचे पालकमंत्री व इतर विभागाच्या काही मंत्र्यांच्या उपस्थितीत विभागीय महसूल आयुक्तालयात आढावा बैठक होत आहे. मंत्रिमहोदय आदेश कोणाला देणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.