आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात धार्मिकस्थळ हटवताना पथकावर दगडफेक, 3 पाेलिस व नागरिक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जुन्या नाशकातील अमरधामरोडवर नानावली येथील एक अनधिकृत धार्मिकस्थळ हटवताना गुरुवारी (दि. १६) रात्री दगडफेक झाली. यात तीन पोलिस अधिकारी काही नागरिक जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत धार्मिकस्थळ हटविण्याची कारवाई सुरू होती.


गेला काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळ हटाव मोहिमेत गुरुवारी पूर्व विभागातील सहा अनधिकृत धार्मिकस्थळे हटविण्यात आली. नानावली येथील एका अनधिकृत धार्मिकस्थळाच्या परिसरात सकाळपासूनच तणावाची परिस्थिती होती. हे धार्मिकस्थळ हटवू देणार नाही, अशी भूमिका घेत सकाळी ११ पासून परिसरातील तीनशेहून अधिक महिला धार्मिकस्थळाच्या बाहेर ठाण मांडून बसल्या होत्या.

 

महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने आधी मुंबई नाका परिसर, पखालरोड आणि नासर्डी पुलाजवळील अनधिकृत धार्मिकस्थळांवर कारवाई करत संध्याकाळी सातच्या सुमारास जुन्या नाशकात दाखल झाले. अतिक्रमण निर्मूलन पथक या ठिकाणी येताच परिसरात जमलेल्या जमावाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळातच काेणालाही काही समजण्याच्या अात एकच पळापळ झाली. धावपळ झाल्यानंतर काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह काही नागरिक जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


दरम्यान, एका अल्पवयीन मुलाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना थेट जेसीबीवर चढून मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

 

जेसीबीच्या धक्क्याने शाॅर्टसर्किट : महापालिकेमार्फत कारवाई सुरू असताना धार्मिकस्थळाजवळ असलेल्या विद्युत खांबाला जेसीबीचा धक्का लागल्याने मोठे शॉर्टसर्किट झाले. मात्र, यात कोणतीही हानी झाली नाही. सुदैवाने महापालिकेचा जेसीबी कर्मचारी यात बचावला.


पोलिस अधिकारी जखमी : दगडफेकीत म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख जखमी झाले. तसेच, आडगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी वैभव खांडेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारीही जखमी झाले. त्यांच्यावर बाटल्या-दगड फेकण्यात आले. देशमुख यांच्या मानेला डोक्याला काच लागली. त्यांच्यावर पंचवटीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

अफवांमुळे घबराट
जुन्या नाशकात अनधिकृत धार्मिकस्थळे हटवताना किरकोळ दगडफेक झाली होती. परिसरात अफवांमुळे जास्त घबराट पसरली होती. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

 

तणाव निवळला, परिस्थिती नियंत्रणात
नानावली भागातील धार्मिकस्थळ हटवताना जमावाने काहीकाळ विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिस प्रशासनाने संयमाची भूमिका राखत जमावाला नियंत्रणात आणले. परिस्थिती अाटाेक्यात येताच न्यायालयाच्या निर्णयानुसार धार्मिकस्थळ हटवण्यात आले. पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे नियोजन यशस्वी ठरले.
- विजय मगर, पाेलिस उपायुक्त (गुन्हे)

बातम्या आणखी आहेत...