आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकल्याण विभागाच्या जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निमाणी बसस्थानका समोरील समाजकल्याण विभागाच्या जागेवरील अतिक्रमण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने जमीनदोस्त केले. सोमवारी (दि.२७) सकाळी १० वाजता ही मोहीम राबविण्यात आली. प्रांताधिकारी तहसीलदारांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात येथील १० ते १२ घरांचे अतिक्रमण काढण्यात आले. रहिवाशांनी पथकाला विरोध केला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत महिलांसह नागरिकांना ताब्यात घेत अतिक्रमण मोहीम फत्ते केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील निमाणी बसस्थानकासमोरील राजवाडा भागात समाजकल्याण विभागाच्या मालकीची जागा आहे. काही वर्षांपूर्वी ही जागा समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय महिलांना अवाॅर्ड केली होती. मात्र, संबंधित रहिवाशांनी मूळ उद्देश बाजूला ठेवत, या विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा प्रशासनाने या रहिवाशांना जागा खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सोमवारी हे अतिक्रमण काढण्यात आले. या मोहिमेबाबत पालिका प्रशासन सहभागी झाले नव्हते. प्रांताधिकारी मंजू लक्ष्मी, तहसीलदार जयश्री अहिरराव यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण काढण्यात आले. परिसरात सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह १५० महिला-पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तणावाची परिस्थिती
अतिक्रमण मोहीम सुरू झाल्यानंतर या ठिकाणच्या नागरिकांनी पथकाला प्रचंड विरोध केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून नागरिकांना ताब्यात घेत, अतिक्रमित घरे पाडण्यात आली. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने नागरिकांचा विरोध मावळला.
बातम्या आणखी आहेत...