आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिटको चौकातील व्यावसायिकांना नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - बिटको चौकात शाळकरी मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी सायंकाळी भाजयुमोच्या वतीने वाहतूक शाखेचे निरीक्षक हनुमंतराव गाडे यांना वाहतूक समस्येबाबत निवेदन देण्यात आले. यानंतर वाहतूक शाखेने सायंकाळी परिसरातील व्यावसायिकांना नोटीस बजावून 32 वाहनांवर कारवाई केली व 3700 रुपये दंड वसूल केला.

या निवेदनात म्हटले की, भाजयुमोच्या यापूर्वीच्या निवेदनाची दखल न घेतल्याने विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. जेलरोडवरील अवजड वाहतूक बंद करावी, रिक्षांच्या विळख्यातून चौक मोकळे करावे, अशी मागणी अध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस सचिन हांडगे यांच्या नेतृत्वाखाली व्हिनस वाणी, बापू सातपुते, मंगेश रोजेकर, शरद हांबरे, सागर टिळे, शांताराम घंटे, यांच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे निरीक्षक गाडे यांच्याकडे केली.

149 अन्वये नोटीस : वाहतूक शाखेने व्यावसायिकांना कलम 149 अन्वये बुधवारी नोटिसा बजावल्या. ग्राहकांच्या वाहनांकरिता स्वमालकीच्या जागेत पार्किंग व्यवस्था करावी. सार्वजनिक रस्त्यावर वाहने पार्क होणार नाहीत, याच्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
कायदेशीर कारवाई
दुकानांसमोर अथवा व्यवसायाच्या ठिकाणी पार्किंग केलेली वाहने, अशा व्यावसायिकांवर मोटार वाहन कायदा व इतर कायद्यान्वये कायदेशीर कारवाई केली जाईल. चौकात अपघाताची घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व्यावसायिकांवर नोटीसमध्ये जबाबदारी निश्चित करण्यात आली.