प्रतिनिधी - नागरिकांच्या सुविधेच्या नावाखाली आमदार, खासदार निधीतून बसथांबे उभारायचे अाणि त्याकडे दुर्लक्ष करायचे असे प्रकार शहरात सर्रास घडलेले दिसून येतात. विशेष म्हणजे, लाेकप्रतिनिधींच्या माध्यमातून उभारण्यात अालेल्या या बसथांब्याच्या देखभालीसंदर्भात महापालिका अाणि एसटी महामंडळाकडूनही एकमेकांकडेच बाेट दाखविले जात असल्याने अाजघडीला लाखो रुपये खर्चून उभालेल्या या बसथांब्यांची प्रचंड दुरवस्था झाली अाहे. अनेक थांब्यांचे तर केवळ सांगाडेच उभे असून, प्रवाशांना त्याचा काडीमात्र उपयाेग नसल्याचे दिसून येते. प्रशासन, लाेकप्रतिनिधींच्या उदासीनतेवर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
आमदार, खासदारांनी त्यांच्या निधीतून केलेली कामे नागरिकांना दिसून यावीत, या उद्देशाने ठरावीक ठिकाणी बसथांबे उभारण्यात येतात. यासाठी लाखाे रुपये खर्च केले जातात. असे असताना प्रत्यक्षात मात्र केवळ गाजावाजा करून बसथांबे उभारण्यापलिकडे काहीच कारवाई हाेताना दिसून येत नाही. कारण, ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या या पिकअप शेडच्या नियमित देखभाल-दुरुस्तीकडे साफ दुर्लक्षच केले जात असल्याने प्रवाशांना त्याचा उपयाेग हाेतच नसल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. पिकअप शेडची झालेली दुरवस्था, परिसरात पसरलेली अस्वच्छता यामुळेे प्रवाशांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्थाच नसते. परिणामी शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या पिकअप शेडच्या बाहेरच उन्हात, पावसाळ्यात प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे रहावे लागत असल्याचे दिसून अाले अाहे. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले हे पिकअप विनाउपयोगाचे ठरत असल्याने लाेकसेवेच्या नावाखाली लाखाे रुपयांचा केवळ चुराडाच हाेत असून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रवाशांची गैरसाेय टाळावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून हाेत अाहे.
चाेरट्यांकडून केले जातेय पत्रे, बेंचला लक्ष्य...
पिकअप शेडचे पत्रे, लाेखंडी बाकडे भुरट्या चोरांनी उखडून नेले अाहेत. परिणामी, लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पिकअप शेडमध्ये प्रवाशांएेवजी गर्दुल्ले, भिकारी यांचेच वास्तव्य दिसून येत आहे.
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
शहरातील पिकअप शेडचा ताबा गुन्हेगारांकडून घेतला जात असून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार केले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या प्रकारांमुळे पिकअप शेडला ‘गुन्हेगारांचे आश्रयस्थान’ असे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मोफत जाहिरात लावण्याचे हाेतेय हक्काचे ठिकाण
शहरातील द्वारका, मुंबईनाका, सिडको, इंदिरानगर, गंगापूररोड या परिसरातील पिकअप शेडवर जाहिराती लावल्याने महापालिकेला जाहिरात करापासून मुकावे लागते, तसेच विद्रुपीकरणातही भर पडत आहे.
विभागीय नियंत्रकांचा प्रतिसाद नाही
याबाबत विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा डी. बी. स्टार प्रतिनिधीने प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
एकमेकांकडे बोट
पिकअप शेडची दुरवस्था झालेली असताना एसटी महामंडळ महापालिका अधिकाऱ्यांकडून याबाबत एकमेकांकडे अंगुलीनिर्देश हाेत अाहे. याबाबत लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय घेऊन दुरुस्तीसाठी ठोस पावले उलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पिकअप शेडचा वापर व्यावसायिक कारणासाठी
बसची वाट बघताना प्रवाशांचा ऊन, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी पिकअप शेड उभारण्यात आले आहेत. मात्र, महापालिका एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे शहरातील पिकअप शेडचा ताबा काही व्यावसायिकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही कारवाईची भीती बाळगता पिकअप शेडमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे.
थेट सवाल, यू. बी. पवार, कार्यकारीअभियंता
शहरातील पिकअप शेडची देखभाल करण्याची जबाबदार कोणाची?
- लोकप्रतिनिधींच्यानिधीतून उभारण्यात आलेल्या पिकअप शेडची देखभाल वापरकर्ते अर्थात एसटी प्रशासनाने करावी असे अपेक्षित आहे.
एसटीकडून देखभालीस महापालिकेला जबाबदार धरले जाते.
- प्रवाशांच्यासोयीसाठी जर एसटी महामंडळाने पत्र दिल्यास बसथांब्याची दुरुस्ती केली जाईल
बस थांब्यांवर लावलेल्या जाहिरातींचे उत्पन कोणाला प्राप्त होते.
- त्या जाहिरातींचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळते.