आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत गाळे हटविण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाेलिसांनी नाकारलेली परवानगी, शांतता झोनमधील अतिक्रमणावरून सुरू झालेला वाद लक्षात घेता, महापौर अॅड. यतिन वाघ यांनी अखेर राजकीय दबाव झुगारून त्र्यंबकरोडवरील अनधिकृत गणेशमूर्ती विक्रीसाठी थाटलेले गाळे हटवण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले. परस्पर गाळे थाटणाऱ्या मंडप ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पश्चिम विभागीय अधिकाऱ्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, यामुळे तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरापर्यंत यात काही नगरसेवकांनीही निर्णय बदलण्यासाठी दबाव टाकल्याचे वृत्त आहे.

गेल्या दोन वर्षांपासून त्र्यंबकरोडवर गणेशोत्सवात थाटल्या जाणाऱ्या विक्रेत्यांच्या गाळ्यांवरून वाद सुरू आहे. हा परिसर शांतता क्षेत्रात मोडत असून, संपूर्ण रस्ताच गणेशोत्सवापूर्वी मूर्ती खरेदीसाठी येणाऱ्या या भाविकांमुळे बंद पडत असल्याचे चित्र असते. या पार्श्वभूमीवर पोलिस खाते तसेच जिल्हा रुग्णालयाचा विरोध असतानाही राजकारण्यांशी संबंधित विक्रेत्यांमुळे महापालिका एक पाऊल मागे घेत असल्याचे चित्र होते. यंदाही अशीच परिस्थिती होण्याची चिन्हे होती. मात्र, महापौरांनी मंगळवारी दबाव झुगारून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त दत्तात्रय गोतिसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत गाळे अनधिकृत असल्याचे सांगत हटवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

४२ पैकी दोनच स्थळांना परवानगी : महापौरांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महापालिकेने ६ ऑगस्ट २०१४ रोजी शहराच्या सहाही विभागात ४२ ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीसाठी गाळे थाटण्याबाबत पोलिस आयुक्तालयाकडून ना हरकत दाखला मागितला होता. मात्र, भद्रकाली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोनच स्थळांना परवानगी मिळाली. त्र्यंबकरोडवरील जागा गाळ्यांसाठी प्रस्ताव महापालिकेने पाठवलेलेच नव्हता, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. ईदगाह मैदानाच्या जागेचा मात्र समावेश असला तरी धार्मिक तेढ निर्माण होण्याची भीती काही संघटनांनी पत्र देऊन व्यक्त केल्यामुळे येथील निर्णय होऊ शकला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यासमोर मंडपाचे काम सुरू : महापौरांनी आदेश दिल्यावरही सायंकाळपर्यंत विक्रेत्यांकडून मंडप उभारणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. विशेष म्हणजे, मंडप हटवण्यासाठी पोलिसांबरोबरच अतिक्रमण विभागाची गाडीही उभी होती. मात्र, त्यांच्यासमोरच मंडप ठेकेदाराच्या व्यक्तींकडून पत्रे चढवणे तसेच विद्युत रोषणाई करण्याचे काम
सुरू होते.

वाद चिघळण्याची चिन्हे : विक्रेत्यांनी सायंकाळी गणेशमूर्ती स्टॉलमध्ये आणल्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या मूर्ती हटवताना पोिलस व अतिक्रमण विभागालाही अडचण निर्माण होणार असून, धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणाखाली अकारण वाद उत्पन्न होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पोलिस परिस्थिती कशी हाताळतात, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेकडून पोलिसांना फक्त अर्जच
महापौरांनी अनधिकृत गाळे हटवण्याबरोबरच मंडप विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात पािलकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाकडून कारवाईबाबत फक्त अर्जच दिल्याचे सरकारवाडा पोलिसांनी सांगितले. थेट फिर्याद दाखल न केल्यामुळे महापालिकेच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. मागील वर्षीही अशाचप्रकारे गाळ्यांबाबत घाेळ घालण्यात अाला होता. त्र्यंबकरोडवरील जिल्हा रुग्णालय परिसर हा शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात अालेले अाहे. या ठिकाणी शांतता राखणे बंधनकारक असताना या ठिकाणी गणेशमूर्ती विक्रेत्यांनी गाळे उभारणे हे शांततेला बाधा अाणणारे अाहे.