आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस बजावू नका,थेट अतिक्रमण हटवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबईनाका परिसरातील मोठय़ा इमारतीपासून तर छोट्या टपरीधारकांपर्यंतची अतिक्रमणे सोमवारपासून हटवण्याचे आदेश महापौर अँड. यतिन वाघ यांनी दिले. विशेष म्हणजे, इमारतींना पूर्णत्वाचा दाखला नसतानाही त्यांनी व्यावसायिक प्रयोजनासाठी बांधलेले ओटे बघून विनानोटीस तत्काळ बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शहरातील सर्व इमारतींचे प्लॅन मंजूर करताना तसेच पूर्णत्वाचा दाखला देताना नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनी समक्ष पाहणी करावी, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.

स्थायी समितीच्या सभेनंतर गुरुवारी महापौर वाघ व स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे यांनी मुंबईनाका परिसराचा दौरा केला. मुंबईनाका ते अशोक स्तंभापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार असून, यात अडथळे ठरणार्‍या अतिक्रमणांची पाहणी केली. रस्त्यात छोट्या टपरीधारकांपासून तर ट्रॅव्हल्स एजंट कार्यालये आढळल्यामुळे ती तत्काळ हटवण्याचे आदेश त्यांनी दिले. इमारतींच्या मार्जिन प्लेसमध्ये अतिक्रमणे असल्याचे लक्षात आले. टॅक्सींचे अतिक्रमण मोठे असल्यामुळे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनाही महापौरांनी चर्चेसाठी आमंत्रित केले. तत्पूर्वी 15 टॅक्सींची परवानगी असताना 250 टॅक्सी येथून वाहतूक करीत असल्यामुळे त्यांना तत्काळ मोकळ्या जागेवरील पर्यायी पार्किंगची जागा पे अँण्ड पार्क तत्त्वावर देण्याचे ठरले. एका इमारतीने वाहनतळासाठी थेट रस्त्याची जागा वापरल्याचे बघून महापौर संतप्त झाले. त्यांनी नगररचना विभागाचे अधिकारी संजय घुगे यांना प्रत्यक्ष पाहणी करूनच इमारतीला मंजुरी दिली का, असा सवाल केला.

टॅक्सी संघटनेचे कार्यालय काढणार : नाशिक-मुंबई-शिर्डी या मार्गावरील टॅक्सी चालक-मालक संघटनेचे कार्यालय काढून त्यांना पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश वाघ यांनी दिले. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मुंबईनाका परिसरात मोकळ्या त्रिकोणी जागेत वाहनतळ सुरू करण्याचे आदेशही दिले. रस्ता अडविणार्‍या ट्रॅव्हल्सच्या बसेसवर वाहतूक पोलिसांबरोबर संयुक्तरीत्या कारवाईचे आदेश दिले.\\

रविवारपर्यंत दिली मुदत
मदिना चौक मार्ग मुंबईनाका ते सारडा सर्कल या रस्त्यावर पडलेले भंगारमधील साहित्य जप्त करण्यासाठी अधिकार्‍यांनी अतिक्रमणविरोधी पथकाच्या गाड्यांना पाचारण केल्यावर येथील व्यावसायिकांनी तत्काळ महापौरांची भेट घेत रविवारपर्यंत सर्व अतिक्रमण काढून घेऊ, असा शब्द दिला. तसे न झाल्यास सोमवारी पालिका कारवाई करेल, असा इशारा वाघ यांनी दिला.

कोणाचाही दबाव नाही
मुंबईनाका परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी कोणाचाही दबाव नाही वा ज्याअर्थी कारवाईला सुरुवात झाली त्याअर्थी कोणाचाही दबाव नसेल असे स्पष्ट होते. अतिक्रमण काढून पुन्हा जे अतिक्रमण करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अँड. यतिन वाघ, महापौर