आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई नाक्यावर अतिक्रमणे जमीनदोस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडलेल्या मुंबईनाका भागातील बहुतांश अतिक्रमणे सोमवारी काढण्यात आल्याने परिसराने मोकळा श्वास घेतला. काही हॉटेल व्यावसायिकांसह सुमारे 15 टपर्‍या आणि पत्र्यांच्या 10 पक्क्या शेडचे अतिक्रमण हटवण्यात आले. पोलिसांचा फौजफाटा व महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या 150 अधिकारी, कर्मचार्‍यांनी ही मोहीम राबविली.

चार दिवसांपूर्वीच महापौरांनी अतिक्रमण निर्मूलन व नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांसह पाहणी करून अतिक्रमणधारकांना रविवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, रविवारनंतरही अतिक्रमण न हटवल्याने सोमवारी पहाटेपासून अतिक्रमण निर्मूलन व पोलिसांची पथके तेथे जाऊन धडकली. मनसेच्या कार्यालयापासून टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या कार्यालयापर्यंत आणि वाहतूक पोलिस शाखेपासून सरोज ट्रॅव्हल्सपर्यंतच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

मोठा फौजफाटा : मोहीम यशस्वी करण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांसह अतिक्रमण निर्मूलन विभागाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भद्रकाली व सरकारवाडा पोलिस ठाण्याचे सुमारे 60 अधिकारी व कर्मचारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम, सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी जयर्शी सोनवणे, आर. आर. गोसावी, ए. पी. वाघ, बी. वाय. शिंगाडे, सहाय्यक अधीक्षक डी. बी. सुरासे, जी. जे. गवळी, संजय पगार, अर्जुन भावले तसेच पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी ही मोहीम राबवली.

सत्ताधार्‍यांना अभय दिल्याचा आरोप
मनसेच्या कार्यालयाला पथकाने हातही लावला नाही. मात्र, त्याजवळील इतर अतिक्रमणे काढण्यात आल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करीत महापालिका भेदभाव करीत असल्याचा आरोप केला. हे कार्यालय व हॉटेल साहेबा खासगी जागेत असून, नगररचना विभागाकडून कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती बहिरम यांनी दिली. बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण करणार्‍यांनी ते काढून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वाहनधारक हैराण
मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. सकाळपासूनच सिडको, इंदिरानगर या भागातून येणारी वाहतूक महामार्ग, तसेच वाहतूक पोलिस ठाण्यापासून सारडा सर्कल मार्गाने वळवण्यात आली. जुन्या महामार्गावरून मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक त्र्यंबक नाक्यापासून इतरत्र वळविण्यात आली होती. वाहतूक कोंडीचा ताण द्वारका सर्कलवर पडला.

मोहीम यापुढेही जारी राहणार
सिंहस्थाच्या अनुषंगाने प्रमुख मार्गांचे डांबरीकरण व रुंदीकरण केले जाणार आहे. अशा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढले जातील. त्याबाबतचे नियोजन केले असून, 30 मीटरच्या गंगापूररोडवरील अतिक्रमणही हटवण्यात येणार आहे. संजय खंदारे, आयुक्त, महापालिका

दोन दिवसांत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ
प्रशासन दोन दिवसांत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ करणार आहे. महामार्ग बसस्थानकाच्या दर्शनी भागात जाहिरातीचे दोन मोठे मनोरे असल्याने नवीन प्रवाशांना स्थानक दिसत नव्हते. हे अतिक्रमण काढण्यात आले.

असे निघाले अतिक्रमण
रहदारीला अडथळा ठरणार्‍या 10-15 टपर्‍या व पत्र्याचे 10 शेड काढण्यात आले. टॅक्सी चालक-मालक युनियनचे पक्के बांधकाम पाडण्यात आले. जाहिरातीचे मनोरे गॅस कटरने तोडण्यात आले.