आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेच्या कार्यालयाचे अतिक्रमणही भुईसपाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबई नाक्यावरील मनसेच्या कार्यालयाचे अतिक्रमण मंगळवारी भुईसपाट करण्यात आले. यासंदर्भात स्थानिक व्यावसायिकांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केला होता. यामुळे मनसेचे सरचिटणीस तथा आमदार वसंत गिते यांनी या आरोपाची दखल घेत स्वत:हून मनसैनिकांसह हे अतिक्रमण काढण्यास सहकार्यच केले. दरम्यान, सारडा सर्कलवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश महापौरांनी दिले.

सारडा सर्कलची पाहणी : महापौर अँड. यतिन वाघ यांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत सारडा सर्कलवरील अतिक्रमणांची पाहणी करत ते काढण्याचे आदेश दिले. सर्कलवर नियमित वाहतूक कोंडी होत असल्याने तेथील वाहतूक सुरळीत व्हावी, या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. परिसरातील व्यावसायिकांशी संवाद साधत त्यांनी अतिक्रमणे त्वरित काढण्याचे आदेश दिले.

व्यावसायिकांनी घेतली भेट : सारडा सर्कलवरील व्यावसायिकांनी महापौर वाघ यांची रामायण येथील निवासस्थानी भेट घेऊन दुकाने न काढण्याची मागणी केली. यासंदर्भात न्यायालयाने स्थगिती दिलेली असून, ही सर्व दुकाने खासगी जागेत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.

मोहीम वेगात सारडा सर्कलवरील अतिक्रमण काढण्याचे महापौरांकडून आदेश; अधिकार्‍यांसह परिसराची केली पाहणी, स्थानिक व्यावसायिकांनी घेतली हरकत

‘देर आये दुरुस्त आये’-माजी महापौर दिवे यांच्या कार्यकाळाची आठवण
कॉँग्रेसचे माजी महापौर अशोक दिवे आणि तत्कालीन आयुक्त के. पी. बक्षी यांच्या कार्यकाळात शहरात सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम राबविली होती. त्याचप्रमाणे भाजपचे माजी महापौर बाळासाहेब सानप यांनीदेखील याच पध्दतीने अशी मोहीम फत्ते केली होती. मनसेने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे या घटनेची आठवण ताजी झाली. मनसेचा जनमाणसातील कमी झालेला प्रभाव पूर्ववत करण्यासाठी ही मोहीम आधार ठरू शकेल.

‘देर आये दुरुस्त आये’, या उक्तीप्रमाणे मनसेने आपल्या स्टाइलने कारभार करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. मनसेसह कोणत्याही पक्षाचा दबाव सहन न करता शहरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र, सत्ताधार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. आगामी सिंहस्थ आणि लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज यांनी मध्यंतरी नाशिक दौर्‍यात पदाधिकारी व महापौरांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत झाडाझडती घेतली होती. त्यानंतर मुंबईत महापौर व नगरसेवकांच्या भेटीत मनसे स्टाइलने कारभार करण्याचा कानमंत्र दिला होता. मुंबईहून परतल्यानंतर महापौरांनी बैठका घेतल्या व अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केल्याने मनसे स्टाइल कारभाराचा प्रत्यय येत आहे.

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत मुंबई नाक्यावरील अतिक्रमण महापालिकेने दूर केल्यानंतर हा परिसर आता मोकळा श्वास घेत आहे. या परिसरात गेल्यावर आता नागरिकांना मोकळे वाटू लागले आहे. छाया : प्रदीप मोरे

नगरसेवकांनीही महापौरांची घेतली भेट
मुंबई नाक्यावरील मनसेचे कार्यालय काढल्यानंतर मनसेच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेत इतर अतिक्रमणे काढण्याची मागणी केली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता ही कारवाई करावी, अशी गळ घातली. महापौरांनीही वाहतुकीला अडथळे ठरणारी सर्व अतिक्रमणे काढणार असे आश्वासन दिले.

इमारतींची चौकशी करावी
बांधकाम परवानगी नसलेल्या अनेक इमारती शहरात असून, त्याबाबत प्रशासनाने चौकशी करून संबंधित अधिकार्‍यांवर तत्काळ कारवाई करावी. त्याचप्रमाणे पार्किंग व साइड मार्जिनच्या जागेचा दुरुपयोग करणार्‍या व रस्त्यांवर अतिक्रमण असलेल्या मिळकतधारकांवरही कडक कारवाई झाली पाहिजे. - वसंत गिते, मनसे सरचिटणीस तथा आमदार

न्यायालयीन बाबी तपासणार
सारडा सर्कल येथील व्यावसायिकांनी न्यायालयाच्या हुकूमनाम्याविषयीचे कागदपत्रे दिली आहेत. त्याची तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाईल. ज्या मिळकतींविषयी स्थगिती असेल त्या सोडून इतर अतिक्रमणे काढली जातील. व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढल्यास कारवाई टळेल. -महापौर अँड. यतिन वाघ