आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांबाबत कातडी बचाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सर्वच कायदे आणि नियमांच्या नाकावर टिच्चून रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने ही नाशिककरांच्या जिवावर उदार झालेली असताना, महापालिकेच्या मुखंडांना मात्र त्याचा घम ना पस्तावा आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे आम्हाला मोहीम राबविता येत नाही, असे म्हणत प्रशासन अतिक्रमण निर्मूलनापासून दूर पळत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र प्रशासनावर दोषारोप करून ‘कातडी बचाव’ भूमिका घेताना दिसत आहेत. त्यातूनच शहरात बिकट झालेली अतिक्रमणाची समस्या तीव्र स्वरूप धारण करीत आहे.

शहरातील रस्ते अतिक्रमणांनी गच्च भरलेले असताना, महापालिकेच्या ‘धृतराष्ट्रांना’ मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक दिसत नाही. विकासकामांच्या नावाने ओरपायला मिळणार्‍या टक्केवारीतच या मंडळींना इतका रस आहे की, त्यांच्या लेखी आता अतिक्रमणासारखा मोठा प्रश्नही गौण ठरत आहे. कोणताही मोठा प्रकल्प न राबविता फोफावलेल्या अतिक्रमणांना हटवून शहराला मोकळा श्वास घेता येईल, अशी व्यवस्था जरी महापालिकेच्या सत्ताधार्‍यांना करता आली असती तरी जनता जनार्दनाने त्यांना खांद्यावर घेत नाचविले असते. परंतु, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काडीमोड घेत ‘खाबुगिरी’तच ही मंडळी व्यस्त झाल्याने मूळ प्रश्नाची सोडवणूक होईल की नाही, अशी भयशंका सर्वसामान्याला डाचू लागलीय. ‘दिव्य मराठी’ने शहरातील अतिक्रमणासंदर्भात ‘अति’ तेथे.. ही मालिका प्रसिद्ध करून रस्त्यावरील भयानक चित्र नाशिककरांसमोर आणल्यानंतर नाशिककर समस्या आणि सूचनांचा अक्षरश: पाऊस पाडत आहेत. या मालिकेला मिळत असलेला प्रतिसाद बघता अतिक्रमणांविषयी नागरिकांमध्ये किती रोष आहे, हे अधोरेखित होत आहे. एखाद्या पक्षाला भुईसपाट करण्यासाठी अतिक्रमणाचा मुद्दा पुरेसा आहे, ही बाबदेखील या वाचकांच्या प्रतिसादातून पुढे आली आहे. त्यामुळे अतिक्रमणाला ‘अति’ सूट देणार्‍यांची माती करण्यासाठीही जनता निर्णायक अवस्थेत आली असल्याचे निदर्शनास येत आहे.

वाहतूक विभागात 270 कर्मचार्‍यांची कमतरता
वाहतुकीच्या नियोजनासाठी पुरेशा पोलिस बळाचीही गरज असते. पुण्यासारख्या शहरात या कामासाठी 1400 कर्मचारी कार्यरत असतात. नाशिकची लोकसंख्या पुण्यापेक्षा एकतृतीयाशांने कमी आहे, असे गृहीत धरल्यास नाशिकला किमान 400 कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात आज केवळ 130 पोलिस कर्मचारी कार्यरत असतात. म्हणजे 270 कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे सध्या असलेल्या कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड दबाव येतो. सकाळी 7 वाजता कर्तव्य बजवायला निघालेल्या कर्मचार्‍याला रात्री 10 वाजेपर्यंत ड्यूटी करावी लागते. इतका वेळ कर्मचारी किती कार्यक्षमपणे काम करू शकतात, याचा मानवी दृष्टिकोनातूनही विचार होणे गरजेचे आहे.

पालिकेकडे रक्कम प्रलंबित
अतिक्रमण निर्मूलनासाठी वापरण्यात येणार्‍या पोलिसांच्या पगारापोटी पालिकेकडे प्रलंबित रक्कम एक कोटी 86 लाख रुपये इतकी असून, वाहतूक विभागाने गेल्या वर्षी बेशिस्त वाहनचालकांकडून वसूल केलेला दंड एक कोटी 30 लाख रुपये इतका आहे.