आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण निर्मूलन माेहिमेचा "मनसे' देखावा; शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या आधी नाशिककर मतदारांवर मोहिनी घालण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी मनसेने शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली खरी; परंतु लोकसभेसह विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर मात्र या मोहिमेचा फज्जा उडाला आहे.

मुंबई नाका येथील अतिक्रमणे हटविल्यानंतर लगेचच गंगापूररोडवरील अतिक्रमणे हटविण्याचे जाहीर करण्यात आले होते. अतिक्रमणे हटविणे तर दूरच, नव्याने झालेली अतिक्रमणे रोखणे महापालिकेला शक्य झालेले नाही.

तत्कालीन आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका कार्यालयाचे अतिक्रमण जमीनदोस्त करीत वर्षभरापूर्वी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर काही काळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मात्र, निवडणूक आचारसंहितेचे कारण दाखवित ही मोहीम थांबविण्यात आली.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकही झाली तरीही मनसेला या मोहिमेची आठवण आली नाही. आज गंगापूररोडची अवस्था बघता ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी झाली आहे. मोहीम राबवू नका पण नव्याने अतिक्रमणे तर थांबवा, अशी विनंती गंगापूररोडवासीयांकडून केली जात आहे. या भागातील सर्वच फुटपाथ, विविध टपऱ्या, दुकानांच्या पाट्या आणि विविध साहित्याच्या अतिक्रमणांनी व्यापले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे या परिसरातील बहुसंख्य हॉटेलमालकांनी पार्किंगच्या जागेत हॉटेलची भिंत बांधून त्याबाहेर वाहने पार्क करण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे सर्व वाहने रस्त्यावर येऊन रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात नसल्याने निर्ढावलेल्या काही व्यावसायिकांनी रस्त्यावरच आपल्या दुकानांचे साहित्य ठेवणे सुरू केले आहे.