आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांसाठी निर्वाणीची मुदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील अनधिकृत बांधकामे व नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याच्या कामास सुरुवात करण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेस पंधरवड्याची मुदत देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांचीही गय करू नका, अशी स्पष्ट सूचना महापौर अँड. यतिन वाघ यांच्यासह महापालिका आयुक्तांना सोमवारी दिली. ठाकरे यांनी स्वत:च ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

ठाकरे म्हणाले की, ठाणे परिसरात अनधिकृत इमारती पडल्याने निष्पाप नागरिकांचे बळी गेले. अशा घटना नाशकात घडू नये, यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारी घ्यावी. आपण 9 जुलैपासून नाशिकला पुन्हा तीन दिवसांच्या दौर्‍यावर येणार आहोत. तोपर्यंत या कामांना निश्चितपणे प्रारंभ झाल्याचे दिसेल.

तीन मॉडेल रस्ते करणार

गंगापूररोड, त्र्यंबकरोड व जुना गंगापूर नाका ते शरणपूर पोलिस चौकी या मॉडेल रस्त्यांची निविदा प्रक्रिया तत्काळ राबविण्याची सूचना राज यांनी केल्याची व सिंहस्थात शासन कोणती कामे करणार याची निश्चित माहिती नसल्याने रिंगरोडला विलंब होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

मनसेच्या शहर कार्यकारिणीला पुन्हा फाटा
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून या दौर्‍यात संघटनात्मक बदल करून फेररचना करण्याची शक्यता असल्याने इच्छुक पदाधिकार्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते; मात्र या विषयाला त्यांनी बगल दिल्याने इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. चार वर्षांपासून शहराध्यक्षपदावरून प्रभावी काम झालेले दिसत नाही, मध्यंतरी आमदार नितीन भोसले यांच्याकडूनच ही जबाबदारी दुसर्‍याकडे सोपविण्याची तयारी दर्शविली होती. तेव्हापासून पक्षात अनेकांनी शहराध्यक्षपदावर वर्णी लागण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. महापालिका निवडणुकीच्या काळातही शहर कार्यकारिणीची चर्चा होती. त्यापाठोपाठ गेल्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार हेमंत गोडसे यांनी थेट पक्षनेतृत्वावरच केलेल्या आरोपांमुळे संघटनात्मक बदल होण्याची चर्चा होती. त्यात विविध पदांवर नव्या चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, या केवळ पदाधिकार्‍यांशी चर्चा करून कार्यकारिणी तयार करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात आले.

नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता आहे. मनसेच्या कारभाराबाबत शहरवासीयांना काही आक्षेप व आरोप आहेत. सोमवारी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत रंगलेली ही जुगलबंदी.
- जकात खासगीकरणाला विरोध करणार्‍या मनसेकडून आता मात्र शहर स्वच्छतेसाठी खासगी संस्थेला कंत्राट व यांत्रिक झाडूची खरेदी.
बिघडले कुठे
पालिकेच्या यंत्रणेवर शहराच्या स्वच्छतेचा ताण पडत असल्यास ठेका खासगी कंपनीला दिला तर बिघडले कुठे?

- शहरात वाढत्या अतिक्रमणांना पालिकेतील सत्ताधार्‍यांकडून तसेच अन्य राजकीय मंडळींकडून वरदहस्त मिळत आहे.
अतिक्रमण हटवा
अतिक्रमणे मनसेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची असली तरी महापालिकेने ती हटवावीत.

- पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार वसंत गिते यांच्यात साटेलोटे असल्याची हेमंत गोडसे यांची पक्ष सोडताना टीका.
पद नाकारल्याने आरोप
पद नाकारले तर लागलीच जातीय आरोप केला जातो हा प्रकारच अत्यंत घाणेरडा आहे.

- नैसर्गिक स्रोतांवर अतिक्रमणे झाल्याने पहिल्या पावसातच महापौरांच्या प्रभागात प्रचंड पाणी तुंबले तरीही महापौर वा पक्षाचे आमदार फिरकले नाहीत.
साहेब, हे खोटे बोलतात..
साहेब हे खोटे बोलतात, त्या रात्री दीडपर्यंत नाशिकरोडला मी पाहणी करत होतो.

- पूररेषेतील बांधकामांना मनसेच्या तिन्ही आमदारांचे सर्मथन असल्यामुळेच त्यांनी महापालिकेला निवेदन दिले.
यांच्याकडे चुकीची माहिती
साहेब, यांच्याकडे अपुरी माहिती दिसते, मुळात पूररेषा गुगलच्या माध्यमातून तयार केल्याने महत्त्वाचा परिसर त्यात समाविष्ट झाला.

(फोटो : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सोमवारी शासकीय विश्रामगृहाबाहेर प्रतीक्षा करताना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.)