आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण निर्मूलन केवळ हातगाड्यांपुरते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आणि आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरातील अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेला सोडलेले फर्मान हवेतच विरले. दीड-दोन महिन्यांपूर्वी राज यांच्या दौर्‍यानंतर आजतागायत अतिक्रमण निर्मूलन विभागाने केवळ रस्त्यावरील हातगाडी चालकांवर कारवाई करून एकप्रकारे राज यांना वाकुल्याच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या दौर्‍यात राज यांनी शहरातील अतिक्रमणांचा विषय छेडत अतिक्रमण कुणाचेही असो हयगय करू नका, असे सूतोवाच करून महिनाभरात शहरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश महापौर आणि आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने घाईघाईने उपायुक्त दत्तात्रय गोतिसे यांच्याकडील अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढून त्या जागी उपायुक्त आर. एम. बहिरम यांची नेमणूक केली. मात्र, ही नेमणूक केवळ फार्स होती की काय, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. कारण बहिरम यांची नियुक्ती होऊनही अतिक्रमणांवर काहीही फरक पडलेला नाही. उलट, जिल्हा रुग्णालयासमोरील गणेशमूर्तींचे अनधिकृत दुकानेही बहिरम यांना हटवता आली नाही. या ठिकाणी पालिकेने मूर्तीविक्रेत्यांपुढे सपशेल लोटांगण घालत गाळ्यांना परवानगी दिली.

250 अनधिकृत बांधकामे दुर्लक्षित
शहरातील बड्या आणि धनिकांची अतिक्रमणे राजरोसपणे उभी असूनही त्याकडे प्रशासनाने कधी लक्ष दिले नाही. अशा प्रकारची 250 अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांची यादी नगररचना विभागाने अतिक्रमण विभागाला देऊनही त्याविरुध्द कारवाई करण्याऐवजी अधिकारी आणि कर्मचारी केवळ रस्त्यांवरील हातगाडी जप्त करण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. यामुळे राज यांनी दिलेल्या आदेशांना धाब्यावर बसविण्याचाच हा प्रकार असल्याचे समोर आले आहे.