आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण मुद्यावरून अधिकारी धारेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर आठवड्याभरात अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा सर्वपक्षीय सदस्य प्रभाग समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकतील असा इशारा सदस्यांनी शुक्रवारी सभापती सुनीता कोठुळे यांच्या अध्यक्षतेखालील प्रभाग समितीच्या बैठकीत दिला.

अतिक्रमण, आरोग्यासह मोडकळीस आलेल्या इमारतींच्या प्रश्नावरून सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले. सदस्य वारंवार शहरातील अतिक्रमणाची माहिती देतात मात्र, काढले जात नाही. प्रशासन सदस्यांचे ऐकत नसल्याचा आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवून परिसर अतिक्रमण मुक्त करण्याची नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी केली. सुनील वाघ यांनी रेल्वे स्थानक परिसरातील पालिकेचा जकात नाका अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचे सांगितले, तर वैशाली दाणी यांनी पथकाकडून चेहरे बघून अतिक्रमण हटविले जात असल्याचा आरोप केला. गटनेते अशोक सातभाई यांनी विभागातील देखभालीस दिलेल्या उद्यानाची माहितीची मागणी केली.

नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी देवळाली गावातील पालिकेच्या कर्मचारी वसाहतीची इमारत मोडकळीस आली असून वादळी वारा, पावसामुळे कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता असल्याने तेथील रहिवाशांच्या स्थलांतराचा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले. मक्तेदाराने पालिका कर्मचार्‍यांना केलेल्या मारहाणीनंतर प्रशासनाने कोणती कारवाई केली, असा सवाल त्यांनी केला. बैठकीस संपत शेलार,ललिता भालेराव, शोभा आवारे, हरीश भंडागे, हेमंत गोडसे, शोभना शिंदे, सविता दलवाणी उपस्थित होते.

मंगला आढाव यांनी दसकगाव ते गोदावरी नदीपर्यंतच्या परिसराची सूचना देऊनदेखील स्वच्छता होत नसल्याचा आरोप केला.

वैशाली दाणी यांनी रमाबाई आंबेडकरनगरातील स्वच्छतागृह मोडकळीस आले असून, कधीही कोसळण्याची शक्यता असल्याचे निर्देशनास आणून दिले. तसेच परिसरासह शौचालय, स्वच्छतेकडे दुर्लक्षाचा आरोप केला.