आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Encrochment On Road Remove, Municipal Corporation Commissioner Khandare Said

रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणार, महापालिका आयुक्त संजय खंदारे यांची घोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहनचालकांची होणारी कोंडी लक्षात घेता, येत्या काही दिवसांतच रस्त्यांच्या कडेला पिवळे पट्टे मारून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महापालिकेचे आयुक्त संजय खंदारे यांनी मंगळवारी केली. ‘दिव्य मराठी’त प्रसिध्द झालेल्या ‘.अति तेथे’ या मालिकेच्या अनुषंगाने ते बोलत होते. अतिक्रमणे काढताना ती कोणी केली आहेत, याचा विचार केला जाणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांना अतिक्रमणांचा फास लागला असून, त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अनेक व्यावसायिक इमारतींना पुरेशा पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने या इमारतींमध्ये येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. फुटपाथवरही वाहने उभी करण्याची पध्दत सध्या रूढ झाली आहे. ‘दिव्य मराठी’ने ‘अति तेथे.’ या मालिकेतून ही बाब पुढे आणल्यानंतर प्रशासनाने अतिक्रमणे काढण्याचे नियोजन केले आहे. यासंदर्भात आयुक्त खंदारे यांनी अतिक्रमणाच्या समस्येचे निराकरण कसे करता येईल, याविषयी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीशी चर्चा केली. वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टिम (बीआरटीएस) राबविण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

रस्त्याच्या बाजूला पिवळे पट्टे मारून प्रथमत: वाहने उभी करण्याची जागा निश्चित करण्यात येणार आहे, असे सांगत आयुक्त म्हणाले की, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे करताना प्रारंभी संबंधित रस्त्याच्या बाजूची अतिक्रमणे सक्तीने काढण्यात येतील. अधिकृत पार्किंगचा लिलाव करून पे अँण्ड पार्क योजना राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र रस्त्यात पार्किंगव्यतिरिक्त उभे असलेली वाहने उचलण्यात येणार आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले.


महत्त्वाचे निर्णय
> बहुपर्यायी पार्किंगची व्यवस्था करणार.
> पार्किंगच्या जागांचा लिलाव करून रस्ते मोकळे करणार.
> अधिकृत पार्किंगव्यतिरिक्त रस्त्यांवर उभी केली जाणारी वाहने जमा करण्यात येणार.
> वाहने उचलण्यासाठी तीन क्रेनची खरेदी.