नाशिक - अभियांत्रिकीसह आैषधनिर्माण शास्त्र पदवी अभ्यासक्रमांकरिता प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ च्या प्रवेशासाठी शासनातर्फे ११ मे रोजी एमएच टी सीईटी ही सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत नोंदणी करण्याची मुदत आहे. सीईटी परीक्षेसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या असून, विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाच्या www.dtemaharashtra.gov.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सीईटी प्रवेश परीक्षा ही राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएच टी सीईटी परीक्षा देणे अनिवार्य असते.
राज्यभरातील शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जातात. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना १४ फेब्रुवारी ते २३ मार्च या दरम्यान परीक्षेकरिता नोंदणी करता येईल. एमबीए एमसीए या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य असल्याने या परीक्षाही मार्च महिन्यात होणार आहेत.
अशी होईल सीईटी
या प्रवेश परीक्षेकरिता तीन प्रश्नपत्रिका असतील. त्यात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र या विषयांची प्रत्येकी ५० गुण असलेली सामायिक प्रश्नपत्रिका असेल. गणितासाठी १०० गुण आणि जीवशास्त्र १०० गुण असलेल्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका आहेत. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसह तसेच औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी एकच अर्ज भरावा लागणार आहे. १४ फेब्रुवारी ते २३ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज भरता येतील. २४ एप्रिल ते ११ मे या दरम्यान प्रवेशपत्र उपलब्ध होतील.
अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक असे
४ व ५ मार्च : एमबीए प्रवेश परीक्षा
१९ मार्च : एमसीए प्रवेश परीक्षा
११ मे : इंजिनिअरिंग फार्मसी प्रवेश परीक्षा