आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेतस्थळ ठप्प: इंजिनिअरिंग परीक्षेचा फज्जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इंजनिअरिंगच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बुधवारी सकाळी 9 वाजता होणारी ऑनलाइन परीक्षा पुणे विद्यापीठाच्या गोंधळामुळे सायंकाळी 5.30 वाजेनंतर एक-एक पेपर उपलब्ध होत सुरू झाली, तर के. के. वाघ महाविद्यालयात तीन विद्यार्थ्यांना रात्री 9.30 वाजेपर्यंत पेपर द्यावा लागल्याने प्रथमच 12 तास परीक्षेचा अनुभव आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली.

परीक्षाच होत नसल्याने आता काय होणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाल्याचे चित्र दिसत असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पुढाकार घेत थेट कुलगुरूंशी संवाद साधत संकेतस्थळ सुरळीत करण्यास भाग पाडल्यानंतर उशिरा का होईना परीक्षा देता आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.

यंदा पुणे विद्यापीठाच्या वतीने इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शंभर गुणांची परीक्षा देणे अनिवार्य केले आहे. त्यातील 50 गुणांची ऑनलाइन आणि 50 गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 50 गुणांची ऑनलाइन परीक्षा बुधवारी सकाळी 9 वाजता महाविद्यालयांमध्ये होणार होती. परंतु, संगणक आणि माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर विभागाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पेपरच संकेतस्थळावर उपलब्ध न करता विद्यापीठाने आपल्या गोंधळ असलेल्या कारभाराची परंपरा कायम राखली. परीक्षेसाठी सकाळी 8.30 वाजेपासून महाविद्यालयात उपस्थित राहूनही विद्यार्थ्यांना ऑनलाइनचे पासवर्डच न मिळाल्याने परीक्षाच देता येत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी गांगरून गेले होते, तर अनेक विद्यार्थ्यांंचे पालकही त्यांच्यासोबत आल्याने त्यांनाही मानसिक त्रास सहन करावा लागला.

या विषयांचे पेपर मिळाले नाही

मेकॅनिकल, इअँडटीसी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या शाखांच्या विद्यार्थी आणि त्यांचे पालकही दिवसभर चिंतेत होते. तसेच सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे दुपारी 4 वाजेच्या दरम्यान परीक्षेचा अर्ज उपलब्ध झाला; परंतु त्यांनी प्रश्न सोडविल्यानंतर प्रश्नच पुढे जात नव्हते. हीच समस्या संगणक आणि आयटीच्याही विषयांच्या विद्यार्थ्यांना सहन करावी लागली होती.

.तर तीव्र आंदोलन करणार

सकाळी 9 वाजता सुरू होणारा पेपर सायंकाळी 5.30 वाजता द्यावा लागल्याने विद्यार्थ्यांची मानसिक आणि शारीरिकही स्थिती बिघडली होती. त्यामुळे ते कितपत दज्रेदार परीक्षा देऊ शकतील, असा प्रश्न उपस्थित करत मनविसेने यात दोषी असलेल्या सर्वच अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी कुलगुरूंकडे केली असून, न झाल्यास विद्यापीठावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी

> आसनव्यवस्था आणि पासवर्ड उशिरा समजले.

> एका वेळेस तीन प्रयत्नांत साइट सुरू न झाल्यास, पुन्हा प्रयत्न करता येत नव्हता.

> परीक्षेची वेळ पुढे सरकत होती; मात्र प्रश्न बदलत नव्हते.

> महाविद्यालयाची वेळ 6 वाजेपर्यंत असूनही संकेतस्थळाचा गोंधळ न निस्तरल्याने परीक्षा बुडण्याची भीती.

> सोडवलेले प्रश्न अपात्र दाखवण्यात येत होते.

> अनेक विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा आहे की नाही याबाबत संभ्रम

> सिन्नरमध्ये प्रश्नपत्रिकाच उपलब्ध झाली नाही.