आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Result News In Marathi, Pune University, Student, Divya Marathi

अभियांत्रिकीच्या निकालांत पुणे विद्यापीठाचा पुन्हा घोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तीर्ण विषयांमध्ये अनुत्तीर्ण आणि पेपरच न दिलेल्या विषयांमध्ये उत्तीर्ण, जो विषय निवडलेलाच नाही त्या विषयातही उत्तीर्ण, हे जादूचे प्रयोग नाहीत, तर पुणे विद्यापीठाचे अभियांत्रिकी परीक्षेच्या निकालातील कारनामे आहेत. यानिमित्ताने विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आला. या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालांमध्ये झालेल्या चुकांमुळे परीक्षा अर्ज भरण्यास उशीर होणार आहे.
क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणार्‍या विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांच्या निकालांमध्ये चुका आढळल्या आहेत. विद्यापीठाकडून आलेल्या या निकालांमध्ये काही विषय वैकल्पिक (इलेक्टिव्ह) स्वरूपाचे असतात. त्यापैकी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाच्या विद्यार्थ्याच्या निकालपत्रात इमेज प्रोसेसिंग हा विषय दश्रविण्यात आला, तर सॉफ्टवेअर टेस्टिंग क्वॉलिटी अँश्युअरन्स विषयाऐवजी मल्टिमीडिया सिस्टिम हा विषय दश्रवला आहे. त्यातही विशेष असे की, विषयांची नावेच बदललेली नाहीत तर ज्या विषयांची परीक्षा दिली त्यात नापास, तर ज्या विषयांची परीक्षा दिलेली नाही (मल्टिमीडिया सिस्टिम) त्या विषयात संपूर्ण गुण मिळालेले आहेत. अशा प्रकारच्या चुका यापूर्वीदेखील अभियांत्रिकीच्या निकालाबाबत झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी विद्यापीठाचा बेजबाबदारपणा या धक्कादायक प्रकारामुळे पुन्हा एकदा दिसून आला.
प्रथम किंवा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल सातत्याने चुकत असतात. शेवटच्या वर्षाचे निकाल चुकल्यास विद्यार्थ्यांना विविध अडचणी येतात. यात कॅम्पस इंटरव्ह्यूत सहभाग घेता न येणे, हाती आलेली नोकरी गमावणे, परीक्षेसाठी बसता न येणे यांसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सोमवारी (दि. 7) विद्यार्थ्यांना परीक्षांचे लेट फी भरून अर्ज भरता येणार होते. मात्र, या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना सुधारित निकालांच्या प्रति न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रश्नावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, विद्यार्थ्यांंचे होणारे हाल थांबविण्यात यावेत, यासाठी असलेल्या विद्यापीठाच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटना, तसेच पालकांनी केली केली आहे.
पहिले पाढे पंचावन्न
गेल्या महिन्यात नाशिकमध्ये असलेल्या पुणे विद्यापीठाच्या विभागीय केंद्राला कुलगुरू वासुदेव गाडे यांनी भेट दिली होती. या भेटीप्रसंगी त्यांनी उपस्थित विद्यार्थी व पत्रकारांना यापुढे पुणे विद्यापीठाच्या निकालात कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाहीत. तसे झाल्यास नाशिकच्या विद्यार्थी कल्याण केंद्रात याविषयी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले असूनही आज ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच परिस्थिती उद्भवली आहे.
अर्ज भरण्यास मुदतवाढ
काही तांत्रिक अडचणींमुळे अशा प्रकारच्या समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये म्हणून परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 9 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार आहे. प्रा. गजानन खराटे, अभियांत्रिकी विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ
विद्यार्थ्यांना मन:स्ताप
विद्यार्थ्यांना सतत अशा अडचणींना सामोरे जावे लागते. सातत्याने होणारा हा मन:स्ताप विद्यार्थ्यांना किती दिवस सहन करावा लागणार आहे, याचे उत्तर देण्यास विद्यापीठ बांधील आहे. या चुकांसाठी सर्वस्वी विद्यापीठ जबाबदार आहे. हा गोंधळ विद्यापीठाने थांबवावा. अजिंक्य गिते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
या निकालांमुळे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना हाती आलेली नोकरी गमावण्याची वेळ येईल. ज्या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षांची तयारी करायची आहे तेदेखील या निकालांमुळे अडकून पडले आहेत. आमच्या भविष्याशी चाललेला खेळ विद्यापीठाने थांबवावा. - शौनक गुजराथी, विद्यार्थी