आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांचे मोबाइल चोरणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी अटकेत, महागडे मोबाइल हस्तगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मौजमजा करण्यासाठी बी.एस्सी. आणि पदवीधर तरुणांकडून एटीएम फोडण्याचा प्रकार ताजा असताना डॉक्टरांचे मोबाइल चोरी करणाऱ्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आडगाव पोलिसांना यश आले आहे. संशयिताकडून चोरीचे तीन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहे. उच्चशिक्षित तरुणांचा गुन्हेगारीकडे कल वाढत असल्याचे या घटनांतून निदर्शनास येत आहे. 

 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे मोबाइल चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. तीन डॉक्टरांनी पोलिसांत चोरीची तक्रार दिली होती. आडगाव पोलिसांचा तक्रार अर्जावर तपास सुरू असताना तंत्रविश्लेषण शाखेची मदत घेण्यात आली. यातील एक मोबाइल सटाणा येथे सुरू झाल्याची माहिती आडगाव पोलिसांना देण्यात आली. पथकाने संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकलच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेला संशयित गौरव प्रकाश खैरनार याने मोबाइल ‘गिफ्ट’ दिल्याची माहिती दिली. पथकाने संशयित खैरनारला ताब्यात घेतले असता मेडिकल कॉलेजमधील बॉइज होस्टेल येथून तीन मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक सुनील पुजारी, डी. आर. खालकर, नितीन शिंदे, मिथुन गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताकडे दोन दुचाकी सापडल्या आहेत. संशयित मूळचा सटाणा येथील राहणारा असून के. के. वाघ अभियांत्रिकीच्या मागे तो भाडेकरारावर रहात आहे. दुचाकी चोरीच्या असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

 

पालकांची उदासीनता 
मुलासउच्च शिक्षणासाठी शहरात पाठवले जाते. वाईट संगतीमुळे जुगार, रोलेट, मद्य आणि अमली पदार्थाच्या अाहारी ही मुले जातात. पुढे ही गरज भागवण्यासाठी ही मुले चोरी, अपहरण, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात सहभागी हाेत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पालकांनी मुला-मुलींचे मित्र, मैत्रिणींची नियमित माहिती घ्यावी, बदललेले राहणीमान याबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. 

 

सुशिक्षित तरुणांचा सहभाग 
उच्चशिक्षित तरुण चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे वाढत्या चोरीच्या घटनांतून निदर्शनास येत आहे. नौदलात जाण्यासाठी एका तरुणाने सोन्याची बिस्किटे चोरी केल्याचे समोर आले होते. मौजमजा आणि व्यसन जडल्याने तरुण गैरमार्गांचा अवलंब करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...