आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाला झोपेच्या तंद्रीतून उठविणारे ‘स्मार्ट डिव्हाइस’, विद्यार्थ्‍यांनी तयार केले यंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रात्रीच्या वेळी होणाऱ्या बहुतांश अपघातांमागे चालकाला लागणारी डुलकी हेच प्रमुख कारण असल्याचे वारंवार पुढे आले आहे. त्याबाबत प्रबोधन होऊनदेखील अपघातातील बळींच्या संख्येत घट झालेली नाही. या पार्श्वभूमीवर चालकाचे डोळे लागताच कर्कश्य अलार्म वाजवून त्याला झोपेतून जागे करणारे अनोखे ‘स्मार्ट डिव्हाईस’ संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. या यंत्रामुळे झोप लागण्याने होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण येऊ शकणार आहे.
 
गेल्या काही वर्षात महामार्गांचे रुंदीकरण होऊनदेखील अपघातांची संख्या मात्र घटलेली नाही. त्यातही रात्री ते पहाटे वाजेदरम्यान होणाऱ्या अपघातांची संख्या अधिक असून, त्यामागे चालकाची तंद्री कारणीभूत असल्याचे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे. जगभरात, दरवर्षी पाच लाखांहून अधिक लोक मोटार अपघातांमध्ये ठार होतात. अशा घटना रोखण्याच्या उद्देशाने श्री महावीर एज्युकेशन सोसायटी संचालित संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बी. ई. कम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केले आहे.
 
काही तज्ज्ञांच्या मते, झोपाळू चालक दारू प्यायलेल्या चालकाएवढाच धोकेदायक असू शकतो. अहवालांवरून दिसून येते की, झोपेमुळे अनेक अपघात होतात. कॉफी घेणे, खिडकी उघडी ठेवणे, च्युइंमग चघळणे किंवा तिखट पदार्थ खाणे यांसारखे सामान्य उपाय करूनदेखील अनेकांची झोप जात नाही. यातला कोणताही उपाय नेमक्या समस्येला सोडवू शकत नाही. या साऱ्या बाबींचा अभ्यास करुन विद्यार्थ्यांच्या टीमने हे डिव्हाइस तयार केले आहे. प्राचार्य डॉ. जयंत पट्टीवार यांनी या संशोधनाबद्दल सांगितले की, महाविद्यालयाकडून एकूण १४ विद्यार्थी प्रकल्प आम्ही पेटंट करत आहोत. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने बनविलेल्या या प्रकल्पाला सर्व स्तरातून सहकार्य मिळत आहे.

विद्यार्थी प्रतिनिधी शुभम पुराणिक याने या संशोधनाबद्दल सांगितले की, वाहन चालकाच्या सुरक्षितेसाठी हे संशोधन महत्वाचे आहे. आम्ही बनविलेल्या उपकरणाच्या आधारे वाहन चालकाचे लक्ष विचलित होणे किंवा त्यास झोप येण्यापूर्वी डुलकी लागत असताना गजर देणारे यंत्र बनविले आहे.
 
डिव्हाइसचे कार्य असे चालते...
वाहन चालू केले की, हे डिव्हाइस त्वरित सुरू होते त्याचक्षणी वाहनचालकाच्या चेहऱ्यासह डोळ्यांचे स्कॅनिंग केले जाते. तसेच, डोक्याच्या हालचालीही संग्रहित केल्या जातात. या सर्व इमेजेस आणि प्रत्यक्ष स्थिती यांचे प्रोसेसिंग करत हे यंत्र सातत्याने चालकावर लक्ष ठेवून असते. चालकाला तंद्री आली किंवा आळस आल्यास ते डोळ्यांच्या हालचालींवरुन लक्षात येते. वाहनचालक झोपेच्या स्थितीत जात असेल तर, अलार्म वाजवून सूचित केले जाते. डोळ्यांवरची झापड दूर होताच आवाज बंद होतो. विशेष म्हणजे गॉगल असेल तरीही हे यंत्र आपले कार्य चोख बजावते.
 
या आविष्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, श्री महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष हरिष संघवी, उपाध्यक्षा वर्षा संघवी, सदस्य राहुल संघवी यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे.
 
या विद्यार्थ्यांनी केले डिव्हाइस तयार
बी. ई.च्या शिवम आंबेकर, मोहन कोरडे, सागर पाटील शुभम पुराणिक या चौघांनी ‘ड्रायव्हर ड्रोव्हनेस डिटेक्शन सिस्टम’ तयार केली आहे. हे यंत्र वाहनात ड्रायव्हर समोरील काचेवर बसविले जाते. त्याचे कार्य हे प्रामुख्याने इमोशनल इंटेलिजन्सवर आधारलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...