नाशिक - नगरसेवक प्रकाश लोंढे यांची पोलिसांनी शनिवारी न्यायालयाच्या अावारात चौकशी केली. लोंढे यांना पोलिसांनी पोलिस कोठडीतून चौकशीसाठी बाहेर काढत न्यायालय अावारात घडलेल्या घटनेचे प्रात्यक्षिक केले. लोंढे यांच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपत आहे. लोंढे यांची पोलिस कोठडी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
याअाधी शुक्रवारी सातपूर येथील निवासस्थान आणि कार्यालयात पोलिसांनी झडती सत्र राबवले होते. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सराईत गुन्हेगार अर्जुन आव्हाड, निखिल गवळे या दोघांच्या खून प्रकरणातील संशयितांना न्यायालयाच्या अावारात पाण्याच्या बाटलीत मद्य देत असताना पोलिस कर्मचारी आहिरे यांनी त्यांना मज्जाव केला होता. याचा राग आल्याने लोंढे यांनी अाहिरे यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर लोंढे फरार झाले होते. जिल्हा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाने लोंढे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लोंढे पोलिसांना शरण आले. न्यायालयाने लोंढे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेत त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. लोंढे पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी त्यांचे निवासस्थान, संपर्क कार्यालयाची झडती घेतली. न्यायालयात ज्या ठिकाणी प्रकार घडला ते ठिकाण लोंढे यांनी पोलिसांना दाखवले. मात्र, फरार संशयिताबाबत लोंढे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस कोठडीत सहा महिन्यांपासून फरार असलेला पुत्र भूषणबाबतही लोंढेंची शहर ग्रामीण पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनी लोंढे यांची न्यायालयात चौकशी केली. न्यायालयात लोंढे समर्थकांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी समर्थकांवर कारवाईचे अस्त्र उगारल्याने समर्थकांनी न्यायालयातून काढता पाय घेतला.