आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमणूक कराचा चेंडू आता वित्त समितीच्या अंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एमएसओ (मल्टी सिस्टिम ऑपरेटर) व केबलचालकांनी करमणूक कर कमी करण्यासाठी थेट महसूलमंत्री आणि सचिवांनाच साकडे घातले. सोमवारी मुंबईत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सचिवांनी त्यास तत्त्वत: मान्यता देत कराचा चेंडू महसूल खात्याऐवजी वित्त समितीच्या कोर्टात टाकल्याने एमएसओंच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

करमणूक करात वाढ व्हावी, याच हेतूने शासनाने डॅश प्रणाली देशात लागू केली. शासनाने हा निर्णय घेतल्याने मार्चपूर्वीच्या कराच्या तुलनेत त्यात कमीत कमी दुप्पट वाढ व्हावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनीच व्यक्त केली होती. त्यानुसार, केबलच्या डिजिटलायझेशनमुळे लपून असलेली ग्राहकसंख्याही समोर आली असून, त्यात जवळपास 215 टक्के वाढ झाली आहे. नाशकात ही संख्या 56 हजार ग्राहकांवरून साधारणत: आता ती अडीच लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे साहजिकच कर वाढणार आहे. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आकारला जाणारा 45 रुपये कर अधिक आहे. त्याचा भुर्दंड ग्राहकांच्याच माथी पडणार असल्याने तो कमी करावा, यासाठी गेल्या चार महिन्यांपासून केबल कंपन्या शासनाशी भांडत आहेत. ही स्थिती एमएसओंनी महसूलमंत्री आणि सचिवांनाही सांगितली. 56 हजार ग्राहकांनुसार कराची रक्कम 25 लाख रुपये होते. जिल्हा प्रशासनाकडे एक लाख 78 हजार ग्राहकांची नोंद असून, ती दोन महिन्यांपूर्वीची असून, आता साधारणत: ती अडीच लाखांपर्यंत गेली आहे. त्यानुसार, 20 रुपये करमणूक कर आकारला तरी 50 लाख रुपये रक्कम होते. म्हणजे आधीपेक्षा ती दुप्पट होते.

उपमुख्यमंत्र्यांच्या अपेक्षेनुसार ही वाढ आहे. त्यामुळे करमणूक कर कमी करावा, अशी विनंती एमएसओंनी केली. तसेच, जाहीर केलेला वसुलीचा आदेशही तात्पुरता स्थगित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यास महसूल सचिव विद्या हुपय्या यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय वित्त समितीसमोर मांडण्याचा सल्ला दिला. तसेच, तेथे या सार्‍या गोष्टी सादर करण्याचेही आदेश या वेळी त्यांनी एमएसओंना दिले. त्यानुसार, लवकरच एमएसओ वित्त समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांच्यासमोर हा प्रस्ताव सादर करणार असल्याचेही डेन कंपनीचे एमएसओ आनंद सोनवणे यांनी सांगितले. बैठकीस माजी आमदार अनिल परब, आनंद सोनवणे, दिलीप साळवे, सतीश सोनवणे, मंगेश वाळूंज, नागेश तायडू, जॉर्विक आदी उपस्थित होते.